Advertisement

शासनही सोशल मीडियावर सक्रिय


शासनही सोशल मीडियावर सक्रिय
SHARES

सध्या सोशल मीडियावर बहुतांश जण सक्रिय आहेत. समाजमन बदलण्यासाठी या सोशल मीडियाचा प्रभावी वापर होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुणांची मने आणि मते घडवण्याची ताकद या सोशल मीडियामध्ये असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. ही बाब लक्षात घेत या सोशल मीडियाचा सदुपयोग करण्यासाठी राज्य शासनाने 'सोशल मीडिया महामित्र' हा उपक्रम राबण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून दहा युवकांची 'सोशल मीडिया महामित्र' म्हणून निवड केली जाणार आहे. त्यांना जिल्हास्तरावर समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. १ ते १८ फेब्रुवारीदरम्यान नोंदणी सुरू झाली असून, शहरातील तरुणाईकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळत आहे.


पारितोषिकही मिळणार

जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्यांना जिल्हास्तरीय मान्यवरांची भेट, वस्तू, लोकराज्य वार्षिक वर्गणी, महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक, तसेच जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र मिळणार आहे. तर, राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण, मान्यवरांसोबत सेल्फी, कॉफी, आपले विचार मांडण्याची संधी, पारितोषिक आणि अन्य भेटवस्तू दिली जाईल. याचसोबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही करायला मिळणार आहे. या संधीचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेऊन 'सोशल मीडिया महामित्र' म्हणून पारितोषिक पटकवावे, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आलं आहे.


अॅप्लिकेशनद्वारे सहभाग

उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 'गुगल प्ले स्टोअर' किंवा 'अॅप स्टोअर'वरून 'महामित्र' हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या ॲप्लिकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करायची आहे. ही नोंदणी प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ वर्षावरील रहिवासी नि:शुल्क सहभागी होऊ शकतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा