केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (3 सप्टेंबर) रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या.
GST कौन्सिलच्या 56 व्या बैठकीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी काय काय बदल झाले हे सांगितले. त्यांनी सांगितलं की जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन दरांच्या जीएसटी व्यवस्थेबाबत एकमत झालं आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की जीएसटीमधील 12 टक्के आणि 28 टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे.
यापुढे जीएसटी व्यवस्थेत 5 टक्के आणि 18 टक्के कर आकारण्याबद्दल एकमत झालं आहे.
22 सप्टेंबरपासून जीएसटी कराचे नवे दर लागू होतील.
जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सरकारला जवळपास 93,000 कोटी रुपयांचा महसुली तोटा होणार आहे.
जीएसटी परिषदेनं दोन स्लॅबना मंजुरी दिली आहे. यापुढे जीएसटीचे 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच दर असणार आहेत.
याव्यतिरिक्त, 40 टक्के स्लॅबमधून सरकारला जवळपास 45,000 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
हा निर्णय सर्वसंमतीनं घेण्यात आला आहे. यासाठी मतदानाची आवश्यकता भासली नाही.
राज्यांना महसूलात होणारी तूट कशाप्रकारे भरून काढायची, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
जीएसटी कौन्सिलमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की पान मसाला, गुटखा, सिगारेट, अनिर्मित तंबाखू, जर्दासारखी चघळली जाणारी तंबाखू यावर व्यवहार मूल्याऐवजी किरकोळ विक्री किंमतीवर(आरएसपी) जीएसटी कर आकारला जाईल.
तसंच राष्ट्रपती सचिवालयानं भारताच्या राष्ट्रपतींसाठी आयात केलेल्या नव्या चिलखती सेडान कारवर त्यावेळच्या आवश्यकतेनुसार आयजीएसटी आणि भरपाई उपकरावर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय-काय स्वस्त झालं?
- दैनंदिन वापरातील स्वस्त झालेल्या वस्तू - जीएसटी 5 टक्के
- हेअल ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट शॉप बार, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम, बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड
- पॅकेज्ड नमकीन, भुजिया मिक्श्चर, भांडी, लहान बाळांची दूध प्यायची बाटली, नॅपकिन आणि डायपर
- शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग
हेल्थकेअर सेक्टर
- आरोग्यविमा आणि आयुर्विमा (जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन शून्यावर)
- थर्मामीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, डायग्नोन्स्टिक किट, ग्लूकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स (जीएसटी 5 टक्के)
- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- सर्व प्रकारचे डायग्नोन्स्टिक किट, रिएजन्ट (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
शिक्षणविषयक सामुग्री
- मॅप, चार्ट्स आणि ग्लोब्स (12 टक्क्यांवरून शून्य)
- पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स आणि पेस्टल (12 टक्क्यांवरून शून्य)
- कृती पुस्तकं आणि नोटबुक (12 टक्क्यांवरून शून्य)
- खोडरबर (5 टक्क्यांवरून शून्य)
कृषी क्षेत्र
- ट्रॅक्टरचे टायर आणि सुटे भाग (18 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ट्रॅक्टर (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- स्पेसिफाईड बायो-पेस्टिसाईड्स, मायक्रो न्युट्रिएन्ट्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ड्रिप सिंचन व्यवस्था आणि स्प्रिंकलर्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- कृषी, फलोत्पादन किंवा वनीकरणासाठी नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणीसाठीची यंत्रं (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
ऑटोमोबाईल क्षेत्र
- पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रीड, एपीजी, सीएनजी कार (1200 सीसी आणि 4000 एमएमच्या आतील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- डिझेल आणि डिझेल हायब्रीड कार (1500 सीसी आणि 4000 एमएमच्या आतील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- तीनचाकी वाहनं (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मोटरसायकल (350 सीसी आणि त्याखालील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मालाची वाहतूक करण्यासाठीची वाहनं (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं
- एअर कंडिशनर (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- टीव्ही (32 इंचापेक्षा अधिक) (एलईडी आणि एलसीडी टीव्हीसह) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर्स (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- डिश वॉशिंग मशीन (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
लक्झरी आणि चैनीच्या सामानावर आता 40 टक्के GST
- तंबाखू, गुटखा, सिगारेट, पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादनं
- साखरयुक्त ड्रिंक्स
- लक्झरी वाहनं