छत्र्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

 lalbaug
छत्र्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
lalbaug, Mumbai  -  

नेहमीच समाजप्रबोधनासाठी जागृृत असणार्‍या लालबाग येथील 'गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट'च्या बालचित्रकारांंनी यंदाच्या पावसात पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रविवारी एक वेगळीच शक्कल लढवली. या बालचित्रकारांनी पर्यावरण संरक्षणासाठी छत्र्यावर विविध चित्र रेखाटली आहेत. त्यात 'झाडे तोडू नका, झाडे लावा', 'मुंबई वाचवा', 'स्वच्छ मुंंबई, सुंंदर मुंंबई' आदी संदेश दिले आहेत. तर बळीराजाचे दुःख दूर होईल का? असा हृदयस्पर्शी प्रश्न देखील या बालचित्रकारांनी चित्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी पावसाळा सुरू झाला की 'झाडे लावा, झाडे जगवा' असे संदेश प्रशासन, संस्था किंवा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात येत असतात. मात्र एक दिवसात हा संदेश देखील नागरिकांच्या डोक्यातून पावसाच्या पाण्यासारखा पुसून जातो. पण असे न होता किमान पावसाचे चार महिने तरी हा संदेश रोज आपल्या समोर राहावा, या उद्देशाने लालबाग येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी एक वेगळीच शक्कल लढवली असून, रविवारी तब्बल 120 छत्र्यांवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी विविध चित्रे या विद्यार्थ्यांनी काढली. या छत्र्या पावसाळ्यात वापरल्या जातील, या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश घराघरात पोहोचण्यास मदत होईल, हे या मागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक सागर कांंबळी यांनी सांगितले.

Loading Comments