Advertisement

मुंबईकरांनो, अजून संकट टळलेलं नाही!


मुंबईकरांनो, अजून संकट टळलेलं नाही!
SHARES

गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं रविवारीही मुंबई, पालघर, वसई, ठाणे यांसारख्या विविध ठिकाणी हजेरी लावली. लाटांचा थरार... अंगाला झोंबणारा वारा... धुवाँधार बरसणारा पाऊस... गरमा गरम भजी-चहा आणि भुट्ट्यावर मारलेला ताव... असं वातावरण मुंबईच्या  समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळालं.

खरतरं रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईच्या चौपाट्या तरुणांनी गजबजून गेल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून पावसानं मुंबईत मुक्काम ठोकल्यानं मुंबईतील वातावरण आल्हाददायक बनलं आहे. त्यामुळे हजारो तरुण-तरुणींनी मुंबईच्या चौपाट्या गाठत पावसाचा मनसोक्त आनंद घेतला. त्यातच एक सेल्फी तो बनता है असं म्हणत पावसात भिजतानाचे सेल्फी काढून काही जण आपला आनंद व्यक्त करत होते. या पावसामुळे पाणी साचण्याचं प्रमाण कमी असलं तरी मुंबईवरील संकट अजून टळलेलं नाही. कारण येत्या २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


उंच लाटा, पाऊस आणि सुट्टी

शनिवारप्रमाणेच रविवारीही मुंबईच्या समुद्रात ४.९७ मीटरच्या उंच लाटा उसळल्या होत्या. यंदाच्या पावसाळ्यातील या सर्वात उंच लाटा असल्यानं या लाटांचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी जुहू चौपाटी, वरळी सी-फेस, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या ठिकाणी गर्दी  केल्याचं चित्र आपल्या पाहायला मिळत होतं. फेसाळलेला समुद्राच्या कठड्याला धडकणाऱ्या लाटा, वाऱ्यासह कोसळणारा पाऊस आणि त्यातच रविवारीची सुट्टी यामुळे मुंबईकरांचा रविवारचा दिवस फारच उत्साहात गेल्याचं चित्र होतं. यावेळी समुद्रात येणाऱ्या उंच लाटांचा थरार  आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.



नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

यासर्व आनंदाच्या क्षणाला गालबोट लागू नये यासाठी मुंबईच्या चौपाट्यांवर महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, लाईफगार्डही तैनात करण्यात आले होते. तसंच भरतीच्या वेळी सेल्फी किंवा फोटो काढताना कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी बॅरिगेट्स लावल्या होत्या. समुद्र किनाऱ्यांपासून किंवा समुद्रालगतच्या रस्त्यापासून तरुणाईला दूर ठेवण्यात आलं होतं.


२४ तासात मुसळधार

हवामान खात्यानं शनिवार, रविवार या दोन्ही दिवशी रेड अलर्ट देण्यात आला होता. परंतु, या दोन्ही दिवशी मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना फार कमी प्रमाणात घडल्यानं मुंबईकर थोडासा निश्चिंत झाला आहे. मात्र अद्याप मुंबईवरचं संकट टळलं नसून येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा