स्वाईन फ्लूने दगावले 3 रुग्ण; गॅस्ट्रोही पसरतोय!

  Mumbai
  स्वाईन फ्लूने दगावले 3 रुग्ण; गॅस्ट्रोही पसरतोय!
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले खरे, पण हे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं साथीच्या रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसह गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत आहे.

  मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये स्वाईन फ्लूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. केवळ 16 ते 22 जून या आठवड्यात स्वाईन फ्लूने 3 रुग्ण दगावले आहेत.

  स्वाईन फ्लू मुंबईच्या वातावरणात इतक्या सहजपणे एकरुप झाला आहे की त्याची लक्षणे 'सीझनल फ्लू'प्रमाणेच दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगतात. एच 1 एन 1 हा विषाणू मुंबईच्या वातावरणात बेमालूमपणे मिसळला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

  मुंबईच्या वातावरणात सातत्याने होणारे बदल आणि धकाधकीची जीवनशैली स्वाईन फ्लूच्या विषाणूच्या वाढीसाठी अगदी पोषक ठरत आहे. हा आजार झालेल्या रुग्णांची लक्षणे ही सर्वसामान्य फ्लूप्रमाणेच दिसून येत आहेत. स्वाईन फ्लूसोबत मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, गॅस्ट्रो या आजारांनीही शहरात डोके वर काढले आहे.


  स्वाईन फ्लूची आकडेवारी - (जाने. ते 22 जून 2017)


  मुंबईतील रुग्ण
  मृत्यू
  मुंबईबाहेरील रुग्ण
  मृत्यू
  285
  10
  68
  6


  या सहा महिन्यांत मुंबईत स्वाईन फ्लूच्या 285 रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईबाहेरुन आलेल्या 68 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.


  नऊ दिवसांत 3 जणांचा मृत्यू

  धारावीत राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे 13 जूनला मृत्यू झाला. मानखुर्द येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे 16 जूनला मृत्यू झाला. तर, मालवणी गेट येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळेच 18 जूनला मृत्यू झाला. अशा प्रकारे गेल्या 9 दिवसांत 3 जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाला आहे.


  धारावीत 500 घरांचे सर्वेक्षण

  धारावीतल्या 24 वर्षीय महिलेला 8 जूनला ताप, खोकला, श्वासाला त्रास आणि घसा दुखणे अशा प्रकारची लक्षणे जाणवू लागली. तिला 11 जूनला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण, तिचा 13 जूनला मृत्यू झाल्यानंतर या परिसरात आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांमार्फत 500 घरांचे आणि 2614 रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 4 स्वाईन फ्लू सदृश लक्षणे असलेले रुग्ण आढळले.


  गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ

  पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो हा आजार पसरतो. 16 ते 22 जूनपर्यंत या वर्षी गॅस्ट्रोचे 201 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ, दूषित बर्फ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.


  आठवड्याभरात गॅस्ट्रोच्या 201 रुग्णांची नोंद

  महापालिकेने रस्त्यांवर अन्नपदार्थ आणि दूषित बर्फाचा वापर केलेल्या पेय पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मे महिन्यात धडक कारवाई केली. मात्र नंतर ही कारवाई संथ होत गेल्यानं शहरात ठिकठिकाणी पुन्हा दूषित अन्नपदार्थांची विक्री होऊ लागली आहे. परिणामी, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळू लागलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईत 16 ते 22 जून या आठवड्यात गॅस्ट्रोच्या 201 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


  गॅस्ट्रोची लक्षणे

  - पोट दुखणे आणि वारंवार पातळ संडास होणे
  - उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे
  - तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे
  - लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे


  उपाययोजना

  - पाणी उकळून आणि गाळून पिणे
  - घराच्या परिसरात स्वच्छता राखणे
  - शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने धुणे
  - अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे 'ओआरएस' पॅक देणे वा मीठ-साखरेचे पाणी रुग्णास देणे
  - रुग्णाच्या आहारात सफरचंद, मऊ शिजलेला भात, लॅक्‍टोबॅसीलयुक्त दही यांचा समावेश करणे
  - 72 तासांच्या आत त्रास न थांबल्यास त्वरित डॉक्‍टरांकडे जाणे  हे वाचा - मुंबईकरांनो, पावसाळ्यात आजारांपासून सावध रहा!

  हे देखील वाचा - स्वाईन फ्लूनंतर मुंबईवर गॅस्ट्रोचे सावट, 916 रुग्ण आढळले  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.