Advertisement

ठाण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट सोमवारपासून बेमुदत बंद

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांबरोबरच ग्रामीण भागातील दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. हॉटेल्स, बार आणि रेस्टाॅरंट यांना मात्र या नव्या नियमावलीमधून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.

ठाण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट सोमवारपासून बेमुदत बंद
SHARES

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला ४ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. संतापलेल्या हॉटेल्स व्यावसायिकांच्या संघटनेने येत्या सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात घरपोच सुविधेसह उपाहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर आस्थापनांना १० वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी असताना हॉटेल्स व्यावसायिकांवरच अन्याय केला जात आहे. रविवारपर्यंत सरकारने हॉटेल्स संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवारपासून ठाणे शहरातील सर्व हॉटेल्स बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव रघुनाथ राय यांनी दिला आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांबरोबरच ग्रामीण भागातील दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. मात्र, मॉल्स आणि चित्रपट गृहांचे शटर मात्र तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट यांना मात्र या नव्या नियमावलीमधून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. हॉटेल्स व्यवसायिकांना पूर्वीप्रमाणेच ४ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याने हॉटेल्स व्यावसायिक संतापले आहेत.

दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी देऊन आम्हाला उपयोग नाही. आमचा खरा व्यवसाय संध्याकाळीच असल्याने किमान संध्याकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल्स व्यावसायिकांनी केली आहे. 

इतर आस्थापनांना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाते मग हॉटेल्स व्यावसायिकांवर सरकारकडून अन्याय का केला जात आहे हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे. रविवारपर्यंत सरकारने आमच्या मागणीचा सकारात्मक विचार केला नाही तर  सोमवारपासून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बेमुदत बंद करून पार्सल सुविधाही बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असा इशारा ठाणे हॉटेल्स असोसिएशनने दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा