Advertisement

आरोग्य समिती अध्यक्षांना डावलून बालस्वास्थ कार्यक्रमाचं उद्घाटन


आरोग्य समिती अध्यक्षांना डावलून बालस्वास्थ कार्यक्रमाचं उद्घाटन
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत पालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते १० वी तसेच बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन चक्क आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांना डावलून थेट अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांनी केलं. आरोग्य समिती अध्यक्षांना डावलताना प्रशासनाने शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनाही डावलले आणि स्थानिक नगरसेवक म्हणून सपाचे गटनेते रईस शेख यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडला. भायखळा पश्चिम येथील मदनपुरा रोडवरील मुहम्मद उमर रज्जाब मनपा ऊर्द शाळेत हा कार्यकम सोमवारी सकाळी पार पडला.


कार्यक्रमाला यांची उपस्थिती

आरोग्य विभागातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त (आरोग्य सेवा ) सुनिल धामणे, ई विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्र.) साहेबराव गायकवाड, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपशिक्षणाधिकारी अर्चना नांदेडकर यावेळी उपस्थितीत होते.


'कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती'

या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना आपल्याला दिली नसल्याचं आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांनी यावेळी सांगितलं. यापूर्वी आय. ए. कुंदन यांनी कुर्ला येथील प्रसुतीगृहाचे उद्घाटन हे आरोग्य समिती अध्यक्षांना डावलून केलं होतं.


याचा फायदा पालिकेच्या विद्यार्थ्यांना

अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी या कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या तपासणीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये जीवनसत्वाचा अभाव असल्यास त्याचे पुढील निराकरण महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे सांगितलं. हा उपक्रम राबवित असताना महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसांठी स्वतंत्र मदत केंद्र स्थापित करण्याचे निर्देश यावेळी कुंदन यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिलं. यासाठी स्वतंत्र असे पथक तैनात करण्यात येणार असून, महापालिकेच्या शाळांत गरीब, गरजू आणि झोपडपट्टी भागातील मुलं मोठ्या प्रमाणात शिकत असल्यानं या कार्यक्रमाचा सर्वाधिक लाभ महापालिकेच्या शाळानांच होणार असल्याचं कुंदन यांनी सांगितलं. यावेळी महापालिकेच्या शाळांमध्ये नियोजनबद्ध पध्दतीने अंमलबजावणी करण्याचं आवाहन सपाचे गटनेते रईस शेख यांनी केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा