वसई (vasai) - विरार (virar) शहरात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. पालिकेने (vvmc) केलेल्या सर्वेक्षणात केवळ शहरात 15 हजार 156 इतकेच फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. फेरीवाले (hawkers) रस्त्यावर तसेच फूटपाथवर वाट अडवून बसत असल्याने वाहतूक व ये-जा करण्यात नागरिकांना अडचण निर्माण होतात.
मात्र शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार असताना देखील 15 हजारच फेरीवाले कसे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शहरात मुख्य रस्ते, ये-जा करण्याचे मार्ग, छोट्या गल्ल्या, फूटपाथ जिथे जागा मिळेल तिथे फेरीवाले बस्तान मांडून आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडी, ये जा करण्याच्या मार्गात अडथळे अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता त्यातून तोडगा काढण्यासाठी व फेरीवाले बसण्यासाठीची जागा निश्चित करण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक पार पडली होती. यात नऊ प्रभागात सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात शहरात केवळ 15 हजार 156 फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले आहे. या सर्वेक्षणानंतर फेरीवाला धोरण, बसण्यासाठीच्या जागा, ना फेरीवाला क्षेत्र, नोंदणी प्रमाणपत्र या सर्व बाबी पूर्ण केल्या जातील.
मात्र शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली असताना पालिकेच्या दप्तरी केवळ 15 हजारच फेरीवाल्यांच्या नोंदी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वसई - विरार (vasai-virar) शहरात फेरीवाले मुख्य रस्ते, फुटपाथ, नाले अशा ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे वाहतूक समस्येसह नागरिकांना ये जा करण्यास अडचणी येत आहेत. ही समस्या सुटावी यासाठी नगररचना विभागाच्या मदतीने फेरीवाला झोन तयार करून फेरीवाल्यांना विशिष्ट जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
याशिवाय जी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी ना फेरीवाले क्षेत्र घोषित केले जाणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची अडसर दूर होऊन नागरिकांना मोकळे रस्ते मिळतील असे दरवेशी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा