मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांत वाहतूक कोंडीची (traffic issue) समस्या आहे.
परंतु विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आणि स्वतःला भावी आमदार म्हणून मिरवणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला प्रचारात वगळल्याचे (avoid) दिसून आले आहे. यामुळे ठाणे (thane) जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीचा (vidhan sabha elections) जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा जवळपास सर्वच पक्षातील उमेदवारांकडून मोठी विकासकामे, आर्थिक मदतीची घोषणा, महापुरुषांची स्मारके तर विविध समाजासाठी भव्य वास्तू यांसारख्या अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे.
परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विषयाला सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार मुद्द्यातून डावलल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदा राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुक विशेष रेल्वे मार्ग, ऐरोली – काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड यांसारखे काही हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वात आपला आणि आपल्या पक्षाचा वाटा किती महत्वाचा आहे, याबाबत उमेदवार आवर्जून भाष्य करतात.
परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याला भेडसावणाऱ्या आणि मूळ प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीबाबत कोणीही आपल्या जाहीर सभेतून अथवा प्रचार मोहिमेतून विषय काढण्यास देखील तयार नाही.
यामुळे प्रचार मोहिमेतून केवळ आपली राजकीय भूमिकाच पुढे रेटून नेण्यात व्यस्त असलेल्या उमेदवारांना त्यांच्याच मतदारसंघातील प्रमुख प्रश्न असलेला वाहतूक कोंडीचा मात्र सराईतपणे विसर होताना दिसून येत आहे.
कापूरबावडी ते फाउंटन हॉटेल या 15 किमी अंतराच्या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गावरून अवजड वाहतुक मोठ्याप्रमाणात सुरू असते. या मार्गावर कापूरबावडी नाका, मानपाडा, ब्रह्मांड नाका, आनंदनगर, कासारवडवली, गायमुख, घाट रस्ता, फाऊंटन हॉटेल हे वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत.
ठाणे शहरातून आनंदनगर टोल नाका ते माजीवडा असा पूर्व द्रुतगती महामार्ग जातो. या 9 किमी अंतराच्या मार्गावर आनंदनगर, तीन हात नाका उड्डाण पूल, नितीन कंपनी उड्डाण पूल, माजीवडा उड्डाण पूल येथे वाहतूककोंडी होते.
कल्याण (kalyan) शिळफाटा रस्ता सुमारे 21 किलोमीटर लांबीचा 6 पदरी मार्ग आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक येथील उड्डाण पुलाचे, रेल्वे मार्गावरील पुलाचे काम रखडले आहे. पलावा चौकात एक ते दोन किमी परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते.
येथूनच जवळ असलेल्या कल्याण फाटा ते महापे रस्त्याची दुरवस्था झाल्याने कायम कोंडी असते. कल्याण शहरातील मानपाडा रस्ता ते टाटा नाका, बैलबाजार ते लालचौकी रस्ता मानपाडा रस्ता ही वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे झाली आहेत. डोंबिवली शहरातील मोठागाव माणकोली फाटक येथे दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
हेही वाचा