उन्हाळ्यामुळे किडनी स्टोन आणि पोटाच्या विकारांमध्ये वाढ

 Mumbai
उन्हाळ्यामुळे किडनी स्टोन आणि पोटाच्या विकारांमध्ये वाढ
Mumbai  -  

वाढत्या तापमानामुळे अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढलेल्या तापमानामुळे अंगावर घामोळ्या उठणे, शरीरात पाण्याची कमतरता होणे, चक्कर येणे, हातापायांची तसेच डोळ्यांची आग होणे यासारख्या अनेक समस्या देखील वाढल्या आहेत. मात्र आता याच वाढलेल्या तापमानामुळे 'किडनी स्टोन'ची देखील समस्या नागरिकांना सतावू लागली आहे. नवी मुंबईमध्ये किडनी स्टोनच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण 'वोक्हार्ट हॉस्पिटलच्या युरोलॉजी आणि नेफ्रॉलॉजी विभागातर्फे नोंदवण्यात आले आहे. 

वोक्हार्ट हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर सोमण डे यांनी केलेल्या निरीक्षणानुसार भारतामध्ये 8 दशलक्षहून अधिक लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे. यातील 50 टक्के रुग्ण फार उशीरा उपचार सुरू करतात. उन्हाळ्यात आपल्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या घामाचे प्रमाण वाढते, त्यातून शरीरातील आवश्यक मिनरल्स देखील बाहेर फेकले जातात. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने लघवीची निर्मिती कमी होते. त्यामुळे किडनीत टाकाऊ मिठाचे प्रमाण वाढते. कालांतराने त्याचे कठीण आणि स्फटीक तुकड्यांमध्ये रूपांतर होते. त्यालाच किडनी स्टोन म्हणतात. या स्टोनचा आकार वाढल्यास पोटात दुखू लागते. तो काढण्यासाठी शस्त्रक्रियेची देखील गरज भासू शकते. गेल्या दोन महिन्यात नवी मुंबईत किडनी स्टोन आणि इतर किडनीच्या विकारांमध्ये 20 टक्क्याने वाढ झाली आहे.

अनेक पदार्थांमध्ये असलेल्या ऑक्सलेट या घटकामुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. बराच काळ लघवी थांबवणे किडनीसाठी धोकादायक आहे अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलच्या युरोलॉजी आणि नेफ्रॉलॉजी विभागातर्फे देण्यात आली आहे. उन्हाळ्यात मिळणारे बर्फाचे गोळे, फळांचे रस, सरबत यात वापरला जाणारा बर्फ हा आरोग्य खात्यातर्फे प्रमाणित केलेला नसतो. अशा बर्फाच्या सेवनामुळे अपचन उलट्या, जुलाब कावीळ यासारखे आजार पसरतात, अशी माहितीही डॉक्टर सोमण डे यांनी दिली आहे .

Loading Comments