Advertisement

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार

मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार
SHARES

मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्यानं आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केल्यानं २ किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गोरेगावच्या नेस्को केंद्रावर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स केंद्रावर नागरिकांची गर्दी झाल्यानं त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वांनाच व्हॅक्सिन मिळणार आहे. लस जशी उपलब्ध होईल, तशा लस देण्यात येणार आहेत. गोरेगावच्या नेस्को केंद्रावरील गर्दी चिंताजनक आहे. नागरिकांनी प्रत्येक सेंटरवर अशी गर्दी केली तर बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. गर्दीत एखादा व्यक्ती जरी बाधित असेल तर दुसऱ्यांना लागण होऊ शकते. त्यामुळे ज्या कारणासाठी लसीकरण होतंय ते बाजूला राहिल. म्हणून नागरिकांनी बोलावल्याशिवाय केंद्रावर येऊ नये, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

कोविन अॅपवर नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही हे नागरिकांना आम्ही सोशल मीडिया, पालिकेच्या माध्यमातून कळवले आहे. पण लोक सरसकट रस्त्यावर आले आहेत. मुंबईत रणरणतं उन आहे. या उन्हाचा त्यांना तडाखा बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. नोंदणीशिवाय कोणत्याही सेंटरवर जाऊ नका, असंही त्या म्हणाल्या.

लस देणं जेवढं आम्हाला बंधनकारक आहे. तेवढंच नागरिक म्हणून स्वयंशिस्त पाळणंही बंधनकारक आहे, असं सांगतानाच मी स्वत: नेस्को केंद्रावर जाऊन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच येणार्या व्हॅक्सीनचा पहिला डोस हा दुसऱ्या डोसवाल्यांनाच देण्यात येणार आहे. त्यांचे डोस पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. दुसऱ्या डोसवाल्यांना डोस दिल्यानंतर पहिल्या डोसवाल्यांना डोस दिला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा