पुरंदरे स्टेडियम वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक

 Naigaon
पुरंदरे स्टेडियम वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक
Naigaon, Mumbai  -  

नायगाव - डॉ. एन. ए. पुरंदरे स्टेडियम हे दादर-नायगाव विभागातील नागरिकांसाठी खेळाचे एकमेव मैदान आहे. हे स्टेडियम पालिकेने ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर देखरेखीसाठी केईएम रुग्णालयाला दिले होते. मात्र आता पालिका प्रशासनाने या जागेत क्लब हाऊस बांधण्याचा डाव रचला असल्याने येथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी या स्टेडियमवर पुन्हा हातोडा मारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी याच वेळी स्टेडियमला भेट देऊन यातून मार्ग काढण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुरंदरे स्टेडियम या मुद्यावर ट्विटही केले आहे. 


पाच दशकांहून अधिक काळ जुने असलेले दादर - नायगाव परिसरातील डॉ. एन. ए. पुरंदरे स्टेडियम पुनर्विकासाच्या नावाखाली कालबाह्य होणार असल्याने येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींची एक बैठक स्टेडियममध्ये 26 मार्च 2017ला घेतली होती. त्यानुसार प्रतिनिधींनी स्टेडियम वाचवण्याच्या दृष्टीने अश्वासने दिली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून हा विषय चर्चेत असतानाच पुन्हा या स्टेडियमवर पालिकेच्या वतीने 4 एप्रिल 2017 ला विना नोटीस हातोडा मारण्याचे काम करण्यात येत होते. या कामाला येथील स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यावेळी स्टेडियमच्या पुनर्विकासाचा प्लॅन नागरिकांना दाखवण्यात आला. त्यात चार मजली इमारत येथे बांधण्यात येणार असून दोन मोठे हॉल, एक एसी हॉल, जिमखाना अशी व्यवस्था करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून मैदान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय. मात्र खासदार राहुल शेवाळे यांनी नागरिकांना आपल्या मागण्यांचे एक निवेदन द्यावे. त्यानुसार मागण्या मान्य केल्या जातील. तसेच नेहमीप्रमाणे या मैदानात नागरिकांना प्रवेश मिळणार आहे अशी ग्वाही शेवाळे यांनी दिल्याने वातावरण शांत झाले. परंतु पालिकेच्या खाजगीकरणाच्या विरोधात पुरंदरे मैदान बचाव समिती लवकरच एक बैठक घेणार आहे. 

कोणतेही खाजगीकरण मैदानात करण्यात येत नसून केवळ सुशोभीकरण करण्यात येत आहे. याचा लाभ भविष्यात स्थानिक नागरिकांना देखील होणार आहे 

- विश्वास मोटे, सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग

"स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या स्टेडियमच्या खाजगीकरणाला माझा विरोध आहे. स्थानिकांच्या घेतलेल्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. सदरील स्टेडियम केईएम रुग्णालयाच्या ताब्यात भाडे तत्व करारावर असले तरी हा करार संपताच पालिकेने स्टेडियम स्वतःच्या ताब्यात घ्यावे. या मैदानाचे शुशोभीकरण करून स्थानिक रहिवाशांना दैनंदिन वापरासाठी खुले करावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे," असे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले.

Loading Comments