Advertisement

भीमा-कोरेगाव हिंसाचार: दुपारी बंदची धग वाढली


भीमा-कोरेगाव हिंसाचार: दुपारी बंदची धग वाढली
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर आंबेडकर अनुयायी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून बंद शांततेत सुरू होता. रेल रोको, रस्ता रोको आणि निदर्शने सुरू होती. पण दुपारी १२ नंतर बंदची धग मुंबईसह ठाण्यात वाढत चालली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा कट रचणाऱ्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण गुन्हा दाखल होऊन कित्येक तास उलटले तरी या दोघांना अटक होत नसल्याने आंबेडकरी अनुयायांकडून राग, संताप व्यक्त होत आहे. हाच राग, संताप बंदची धग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.


दुपारपासून हिंसक वळण

सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या बंदने दुपारनंतर हिंसक वळण घेतलं आहे. ठाण्यात प्रवासी बस जाळण्यात आली असून चेंबूर आणि इतर ठिकाणीही तुरळक दगडफेकीच्या तसेच जाळपोळीच्या घटना समोर अाल्या अाहेत. तर बेस्ट बस फोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आंबेडकर अनुयायांकडून दुपारनंतर मोठ्या संख्येने मोर्चे काढत सरकार आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.


रेल्वे सेवेवर परिणाम

मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या रेल्वे, बेस्ट आणि मेट्रो या तिन्ही वाहतूक व्यवस्थांवर बुधवारच्या बंदचा मोठा परिणाम झाला आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान ठाणे रेल्वे मार्ग आंदोलकांनी रोखून धरल्यानंतर दुपारपर्यंत हळूहळू पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे मार्गावर उतरत रेल्वेचे तिन्ही मार्ग रोखून धरले. त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे रेल्वे मार्ग बंद असून रेल्वे अर्ध्या तासाने उशीराने धावत आहेत.


48 बस फोडल्या, 4 बसचालक जखमी, मेट्रोलाही फटका, 

रेल्वेप्रमाणेच बेस्ट बसलाही महाराष्ट्र बंदचा फटका बसला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास 48 बेस्ट बसेस फोडण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. तर काचा लागल्यामुळे 4 बसचालक अातापर्यंत जखमी झाले अाहेत. अनेक बेस्ट बस मार्ग आंदोलकांनी रोखून धरल्याने बेस्टच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. टॅक्सी आणि रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर आज तुरळक प्रमाणात धावताना दिसत आहेत. त्याचवेळी मेट्रोलाही ब्रेक लागला आहे. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. मात्र त्यानंतर असल्फा मेट्रो स्थानकावर आंदोलक उतरले आणि त्यांनी मेट्रोही बंद पाडली. त्यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानक ते एयरपोर्ट मेट्रो स्थानक अशी मेट्रो सेवा दुपारपासून पूर्णपणे बंद असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्याने दिली आहे. विरोधकांच्या अांदोलनाची तीव्रता पाहता कांदिवली ते अाकुर्ली, दिंडोशी ते हनुमान नगर, चांदिवली ते संघर्ष नगर, खैरानी रोड ते साकीनाका, सहार कार्गो, मुलुंड चेकनाका, जिजामाता नगर या ठिकाणची बेस्ट सेवा बंद करण्यात अाली होती. 


रस्तेही केले बंद

अांबेडकरी अनुयायांनी वांद्रे कलानगर जंक्शन रोखून धरल्यानंतर पश्चिम द्रूतगर्ती मार्गावरही रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. जेवीएलअार अाणि दहिसर चेकनाका इथंही वाहनं एकाच जागेवर तासभर खोळंबून पडली होती. अाकुर्ली ब्रिज (कांदिवली), संतोष नगर (मालाड), कामराज नगर (विक्रोळी), खेरवाडी जंक्शन (बीकेसी), एमअायडीसी (अंधेरी), कुंभारवाडा जंक्शन (माहिम) अाणि वरळी नाका इथंही ट्रॅफिक जॅम झाल्याचं चित्र होतं. 


अनेक शाळा ठेवल्या बंद

सुरक्षेच्या कारणास्तव अनेक खासगी शाळांना बुधवारी सुट्टी देण्यात अाली होती. गोवंडी, मानखूर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्व येथील अनेक शाळा बंद ठेवण्यात अाल्या होत्या. सरकारकडून शाळा बंदची घोषणा करण्यात अाली नव्हती तरी अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलनं सुट्टीची घोषणा केली होती तर शिक्षकांनाही अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात अाली होती. 


विद्यार्थ्यांचा अाजची परीक्षा नंतर घेणार

अाज सकाळपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचणे शक्य झाले नाही. मुंबई विद्यापीठानं अाज होणाऱ्या परीक्षांसाठी उशीरानं येण्याची सवलत दिली होती. पण अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचू शकले नाहीत. विद्यार्थी अाणि पालकांच्या मागणीनुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं तातडीची बैठक बोलावून सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरळीत झाल्याचा दावा केला अाहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना अाजची परीक्षा देता अाली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेतली जाणार अाहे, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं अाहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा