Advertisement

बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता
SHARES

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  

स्मारक प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार २ टप्प्यांमध्ये काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सर्व इमारतीचं बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणं, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. 

हेही वाचा- स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न

तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामं इमारतीचं बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रकमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

दरम्यान, मनसेने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावर शिवसेनेला टार्गेट करत थेट महापौर निवास येथे रखडलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाची आठवण करून दिली होते. बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याच्या ठिकाणी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शिवसेना आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यामध्ये स्मारकाच्या आराखड्याच्या मुद्द्यावर आणि स्मारकाच्या उभारणीस येणाऱ्या खर्चाच्या निमित्ताने चर्चेच्या अनेक फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. पण प्रत्यक्ष कामाला मात्र अद्यापही सुरूवात झालेली नाही, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती.

(maharashtra government sanction 400 crore rupees for bal thackeray memorial project)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा