Advertisement

सीईटीचे वेळापत्रक २ दिवसांत जाहीर होणार

सीईटीचे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटीचे वेळापत्रक २ दिवसांत जाहीर होणार
SHARES

राज्यातील विद्यापीठ, कॉलेजांच्या परीक्षांसह सीईटीचे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. परीक्षांसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर मंगळवारी राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

पदवी आणि पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २० ते ३० जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करून १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येईल का, या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं समजतं.

लॉकडाउनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजर दिवस म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. एम.फिल व पी.एचडीची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. या केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करावे, अशी सूचनाही सामंत यांनी दिली. बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा