महापालिका, खासगी अनुदानित शाळांना वंदे मातरमची सक्ती?

 Mumbai
महापालिका, खासगी अनुदानित शाळांना वंदे मातरमची सक्ती?
Mumbai  -  

'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत बोलण्यावरून विधीमंडळात वादंग निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा तसेच सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा ‘वंदे मातरत’ हे राष्ट्रीय गीत गाण्याची मागणी भाजपाने केली आहे. 

केवळ शाळांच नव्हे, तर महापालिका सभागृहाबरोबरच महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या बैठकांमध्येही वंदे मातरम गीत सुरुवातीला म्हणण्याची मागणीही भाजपाच्या नगरसेवकाने ठरावाच्या सूचना केली आहे. राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी केलेल्या या मागणीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


आठवड्यातून दोनदा म्हणालाच हवे

राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशप्रेमाची भावना सदोदित तेवत असावी म्हणून अलिकडेच चेन्नई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तामिळनाडूमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा सोमवारी किंवा शुक्रवारी ‘वंदे मातरम’हे राष्ट्रीय गीत म्हणणे सक्तीचे केले आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळा आणि महापालिका हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा  वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


वैधानिक, विशेष समित्यांच्या बैठकांनाही...

सध्या महापालिका सभागृहाचे कामकाज हे वंदे मातरम या गीतानंतर सुरु होते. याच धर्तीवर स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती या वैधानिक समित्यांच्या सभांमध्ये तर विधी व महसूल, वृक्ष प्राधिकरण, स्थापत्य शहरे व उपनगरे, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला व बाल कल्याण आदी विशेष समित्यांच्या सभांच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम’ म्हणण्याचे यावे, अशी मागणीही संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली असून पुढील महापालिका सभागृहात हा ठराव मांडला जाणार आहे.


तरुण पिढीसाठी

देशप्रेम, देशभक्ती जागृत करणारे ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय वंदे मातरम या राष्ट्रीय गीतालाही तितकाच मान देत असतो. देशाचे भविष्य असणाऱ्या तरुण पिढीमध्ये तसेच प्रत्येक नागरिकांच्या मनात जाज्वल्य देशप्रेमाची भावना जागृत करण्यात या राष्ट्रगीताचा मोठा हातभार लागतो. एवढेच नाही, तर या राष्ट्रगीतातून आपल्या मातृभूमीला वंदनही केले जाते तसेच भारत मातेबद्दल जाज्वल्य प्रेमही प्रतीत होते, असे संदीप पटेल यांनी म्हटले आहे.


ध्वनीमुद्रीत गाणे लावण्यास सुरुवात

मुंबई महापालिका सभागृह सुरु होताना वंदे मातरम हे गीत गायले जाते. आजवरची ही प्रथा आणि परंपरा आहे. मागील अनेक वर्षांपासून सभागृहात हे गीत सर्व नगरसेवक स्वत: एक सुरात गायचे. परंतु अनेक नगरसेवकांचा बेसूर आवाजामुळे याचे ध्वनीमुद्रीत गीत सभागृहात लावले जावे, अशी मागणी सन २००९मध्ये तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरेसवक आणि सध्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या अॅड मंगेश बनसोड यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. 

त्यानंतर या ठरावानुसार महापालिका सभागृहात वंदे मातरमचे ध्वनीमुद्रीत गीत लावण्यास सुरुवात केली असून या गीताबरोबरच सभागृहातील सदस्य या गीताचे बोल बोलत असतात.

Loading Comments