Advertisement

अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लागणार

या विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याचे झिरवाळ यांनी मान्य केले. विभागाच्या 2,544 मंजूर पदांपैकी केवळ 1,271 पदे भरण्यात आली आहे.

अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लागणार
SHARES

अन्नपदार्थामध्ये भेसळ (adulterating) करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र (maharashtra) संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल’, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सोमवारी दिली.

वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकासह नवजित नगर, अंधेरी (andheri) येथे एकूण सात ठिकाणी छापा टाकला असता तेथे अमूल आणि गोकुळ या नामांकित ब्रँडचे लेबल असलेल्या दुधामध्ये भेसळ करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.

या प्रकरणात आत्तापर्यंत 14 जणांवर अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आमदार भाई जगताप यांनी, या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला.

परंतु, मकोकाच्या धर्तीवर एक नवा कायदा येत असल्याचे  झिरवाळ यांनी सांगितले. मात्र, त्यावर आमदार भाई जगताप आणि अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेतला.

जीवनावश्यक वस्तूत भेसळ झाल्यावर जिवावर बेतू शकते हे माहिती असून संघटित गुन्हेगारीवर मकोका (MACOCA) का लावता येत नाही, असा प्रश्न विचारला.

त्यावर, कायदेशीर बाबी तपासून अधिवेशन संपण्याआधी खुलासा करू, असे उत्तर झिरवाळ यांनी दिले. त्यावर आमदार अनिल परब यांनी आक्षेप घेत, मकोका लावणार की नाही, हे स्पष्ट सांगणार की नाही अशी विचारणा केली.

तसेच आमदार जगताप यांनी हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला भेडसावणारा असून त्यावर कठोर कारवाई करण्याचे सोडून अधिकाऱ्यांना का वाचवत आहात, 10-12 बळी गेल्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

अखेर, विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार झाल्यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, सभागृहातील सदस्यांची भावना लक्षात घेता भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे घोषित केले.

तत्पूर्वी, या विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याचे झिरवाळ यांनी मान्य केले. विभागाच्या 2,544 मंजूर पदांपैकी केवळ 1,271 पदे भरण्यात आली आहे. उर्वरित पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात आला होता.

परंतु, त्यात काही त्रुटी काढण्यात आल्याने त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच, विभागात पदे वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकांनी आपले छापे वाढवावेत यासाठी सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागात 197 कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये मोठे बदल

वांद्रे-खार-सांताक्रूझमध्ये 'या' तारखेला 16 तास पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा