Advertisement

मुंबईच्या किमान तापमानात प्रचंड वाढ

मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांच्या पलीकडं गेलं

मुंबईच्या किमान तापमानात प्रचंड वाढ
SHARES

मुंबईच्या तापमानात प्रचंड वाढ झाली नागरिकांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. सोमवारी मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांच्या पलीकडं गेलं होतं. सांताक्रूझ इथं कमाल तापमानाची नोंद ३७.८ अंश, तर कुलाबा इथं ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं. किमान तापमानही सांताक्रझ इथं २६.४, तर कुलाबा इथं २७.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. सांताक्रूझ येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांमधील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचं तापमान आहे. सोमवारी उपनगरांमधील तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचलं होतं.

मुंबईचा पारा सोमवारी सरासरी तापमानापेक्षा अधिक नोंदवला गेला. सरासरीपेक्षा सांताक्रूझ येथील कमाल तापमान तब्बल ५ अंशांनी अधिक होतं. तर, कुलाबा येथील कमाल तापमान २.८ अंशांनी अधिक होतं. सांताक्रूझ येथील तापमानात रविवारपेक्षा २.८ अंशांची वाढ झाली. यंदाच्या एप्रिलमधील हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे. 

याआधी सन २०१४ मध्ये तापमानाचा पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला होता. तर सन २०१६ आणि २०१२ मध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमान ३८ अंश होतं. आत्तापर्यंत एप्रिलमधील सर्वाधिक तापमान सन १९५२ मध्ये ४२.२ अंशांपर्यंत पोहोचलं होतं. सोमवारी कोकण विभागात सोमवारचं तापमान आणि सरासरी कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत आढळून आली. 

कमाल तापमानात एक ते दोन अंशांची घट अपेक्षित आहे; तर किमान तापमान मात्र २७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही उपनगरांमध्ये पारा कमालीचा चढला होता. कालिदास येथील स्वयंचलित नोंदीनुसार तापमान ३९.९ होते. त्या खालोखाल जेव्हीएलआर येथे ३९.७, बोरिवली पूर्व येथे ३९.४, गोरेगाव येथे ३८.८ अंश सेल्सिअस होते. किमान तापमानाचा पारा भांडुप, मुलुंड, कांदिवली पूर्व, मालाड, गोरेगाव येथे चढा नोंदवला गेला. त्यामुळे उपनगरांमध्ये अधिक उकाड्याची जाणीव झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा