Advertisement

मेट्रो 4 वरील विक्रोळी मेट्रो स्थानक 'या' रेल्वे स्थानकाला जोडणार

ही मार्गिका मुंबई आणि ठाण्याला जोडणार आहे.

मेट्रो 4 वरील विक्रोळी मेट्रो स्थानक 'या' रेल्वे स्थानकाला जोडणार
SHARES

वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेवरील विक्रोळी मेट्रो स्थानक कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाला पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली.

मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिकांचे संचलन सुरू आहे. या मार्गिकांना सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता मुंबईकर हळूहळू मेट्रोकडे वळू लागले आहेत. येत्या काही वर्षांत मुंबईतील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांमध्ये भर पडणार आहे. त्यात मेट्रो 4 मार्गिकेचाही समावेश असणार आहे. ही मार्गिका मुंबई आणि ठाण्याला जोडणार आहे.

अनेक मेट्रो स्थानके भविष्यात रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहेत. या निर्णयाप्रमाणे विक्रोळी मेट्रो स्थानक कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. अंदाजे 740 मीटर लांबीच्या पादचारी पुलाद्वारे ही जोडण केली जाणार आहे. यासाठी 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पादचारी पुलाद्वारे प्रवाशांना थेट विक्रोळी मेट्रो स्थानकातून कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात वा कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून विक्रोळी मेट्रो स्थानकात पोहचता येणार आहे.

एमएमआरडीएने या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा अंतिम करून या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या पुलाचे काम 18 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. या पादचारी पुलावर एक सरकता जिना असणार आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या पादचारी पुलावर 25 सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.



हेही वाचा

विरार–दहाणू मार्गावर आता 15 कोच लोकल्स धावणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा