Advertisement

राणीच्या बागेचा १० एकरात विस्तार

विस्तारानंतर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

राणीच्या बागेचा १० एकरात विस्तार
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग (Byculla zoo) आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. लवकरच तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मफतलाल मिलच्या जागेवरील विस्ताराचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे.

ब्लॅक जग्वार, चित्ता, पांढरा सिंह यासह देश-विदेशातील नवे प्राणी आणि पक्ष्यांचे राणीबागेत आगमन होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून कामाच्या निविदा शुक्रवारी पालिके (BMC)नं मागवल्या आहेत.

राणीबागलगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटरचा भूखंड असून, तो मफतलाल मिलला भाडेपट्ट्यावर देण्यात आला होता. या भाडेपट्टीचा कालावधी सन २०१७मध्ये संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या भूखंडाचा निम्मा म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर (दहा एकर) भूभाग पालिकेला मिळाला आहे.

ऑगस्ट, २०१७ मध्ये राणीबागेत पेंग्विन आणण्यात आल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राणीबागचा तीन टप्प्यांत विकास केला जात आहे. ९० कोटी रुपये खर्चून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वाराजवळ प्लाझा, उद्यानाचे सुशोभिकरण, पायावाटांची दुरुस्ती, सुरक्षेसाठी कुंपण, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा आणि पेंग्विन कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून ते पूर्णत्वाच्या दिशेनं आहे. १२० कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. या टप्प्यात १७ पिंजऱ्यांचे बांधकाम हाती घेण्यात आलं आहे. आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक म्हणजे १५ पिंजऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

येत्या काळात येथे परदेशी पाहुण्यांची लगबग पाहायला मिळणार आहे. जग्वार, चित्ता, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिम्पान्झी, लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी, पक्षी आणले जाणार आहेत. गुजरातच्या गिर प्राणीसंग्रहालयातून पांढरा सिंह आणला जाणार असून या बदल्यात त्या प्राणीसंग्रहालयाला झेब्रा दिला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात वाघ, हत्ती, बिबळ्या, कोल्हे, हरणे, काळवीट यासह विविध प्रकारचे प्राणी आणण्यात आले आहेत. वर्षभरापूर्वी मंगळूर इथल्या पिलीकुलालू प्राणीसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्याची जोडी राणीबागमध्ये आली आहे.

राणीबागमध्ये पक्ष्यांसाठी स्वतंत्र पक्षी उद्यान या विस्तारात उभारले जाणार आहे. तसंच उद्यानात देशविदेशातील आणखी पक्षी वाढणार आहेत. काही पक्षी इतर पक्षीसंग्रहालयांतून आणले जाणार असून, त्या बदल्यात राणीबागेतले काही पक्षी त्यांना दिले जाणार आहेत.



हेही वाचा

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा