
बोरिवली रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या पुनर्विकासाला गती देण्याबरोबरच बोरिवली-चर्चगेट मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी विष्णू (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली आहे.
दररोज सुमारे 4.5 लाख प्रवाशांची वर्दळ असलेले बोरिवली हे मुंबईतील सर्वाधिक व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पंतप्रधानांच्या अमृत भारत स्टेशन (Amrit Bharat Station Scheme) अंतर्गत या स्थानकाच्या आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीला आधीच मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पात सरकते जिने (एस्कलेटर), लिफ्ट, एसी लोकल सेवांचा विस्तार, पार्किंग सुविधांमध्ये सुधारणा आणि प्रवाशांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.
'लोकसत्ता'शी बोलताना उपाध्याय यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांनी बोरिवली स्थानकाचा विकास आराखडा तयार असून तो लवकरच प्रत्यक्षात आणला जाईल, अशी माहिती दिली आहे.
उपाध्याय यांनी दहाणू, विरार आणि बोरिवलीदरम्यान धावणाऱ्या विद्यमान मेमू (MEMU) सेवांच्या जागी नव्या उपनगरीय लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या मते, जुन्या मेमू डब्यांमध्ये वायुवीजन, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेच्या समस्या असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर एसी आणि नॉन-एसी डब्यांचा समावेश असलेल्या नवीन लोकल सेवा सुरू कराव्यात.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना नवी मुंबईशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी बोरिवली ते बेलापूर दरम्यान थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या या मार्गावरील प्रवाशांना मध्येच गाडी बदलावी लागते. थेट सेवा सुरू झाल्यास एपीएमसी मार्केटमध्ये जाणारे व्यापारी, शैक्षणिक संस्थांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
तोपर्यंत विद्यमान अंधेरी-बेलापूर लोकल सेवा सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करण्याची मागणीही त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
पश्चिम उपनगरांमधून कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या दादर येथे गाडी बदलावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी वसई आणि दिवामार्गे बोरिवली-कल्याण थेट उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही उपाध्याय यांनी मांडला आहे.
त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, गर्दी कमी होईल आणि पश्चिम उपनगर व ठाणे-कल्याण परिसरातील संपर्क अधिक सुलभ होईल, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा
