Advertisement

अग्निशमन दल खरेदी करतंय १४ लाखांची फायर बाईक

नगरसेवकांच्या मागणीनुसार ५ फायर बाईक्सची खरेदी केली जात आहे. सुमारे दोन लाखांच्या बाईकवर साडेआठ लाखांचा खर्च बांधणीसाठी करून साडेदहा लाखाला ही फायर बाईक खरेदी केली जात आहे. तर पुढील ५ वर्षांचं देखभाल भाडं गृहीत धरता या बाईकची खरेदी तब्ब्ल १४ लाखांच्या घरात जात आहे.

अग्निशमन दल खरेदी करतंय १४ लाखांची फायर बाईक
SHARES

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता ५ नवीन फायर बाईक्स दाखल होत आहेत. मागील अनेक वर्षाँपासून अशाप्रकारच्या फायर बाईक्सची खरेदी करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणीनुसार ५ फायर बाईक्सची खरेदी केली जात आहे.

सुमारे दोन लाखांच्या बाईकवर साडेआठ लाखांचा खर्च बांधणीसाठी करून साडेदहा लाखाला ही फायर बाईक खरेदी केली जात आहे. तर पुढील ५ वर्षांचं देखभाल भाडं गृहीत धरता या बाईकची खरेदी तब्ब्ल १४ लाखांच्या घरात जात आहे.


म्हणून घेतला 'हा' निर्णय

मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आणि चिंचोळे रस्ते यामुळे बऱ्याचदा झोपडपट्यांसह अनेक भागांमध्ये आगीच्या दुघर्टना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचणी येतात. बऱ्याचदा आगीच्या वर्दीच्या ठिकाणी वेळीच पोहाचता येत नसल्यामुळे अनेकदा आग अधिक प्रमाणात फोफावते.

त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर फायर बाईकवरून दोन जवान त्वरीत घटनास्थळी रवाना केल्यास तेथील परिस्थिती लक्षात घेऊन ते आगीचा कॉल दलाला देतील. तसेच आग विझवण्याच्या प्राथमिक प्रयत्नही करतील, याच उद्देशाने अग्निशमन दलाच्यावतीनं फायर बाईक्सची खरेदी केली जात आहे.


ही कंपनी पात्र

यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एकमेव कंपनी असलेली ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टीम ही कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेच्या नियमानुसार निविदेत एक कंपनीनं भाग घेतल्यास ते रद्द करून फेरनिविदा मागवणं बंधनकारक आहे. परंतु तसं न करता या एकमेव कंपनीला हे काम देण्यात आल्यामुळे हे वादात अडकण्याची शक्यता आहे. या कंपनीकडून गाडीचा हमी कालावधी न घेता पहिल्या वर्षांपासून देखभालीचं कंत्राटच संबंधित कंपनीला दिलं जाणार आहे.

 

७१ लाख २७ हजार ८२२ रुपयांचा खर्च

रॉयल एन्फील्ड हिमालयीन ही बाईक १ लाख ९३ हजार ८१६ रुपयांना खरेदी केली जात आहे. त्या बाईकचं बांधणी करण्यासाठी ८ लाख ४४ हजार ६०८ रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. प्रत्येक बाईकचे पाच वर्षाँचे देखभालीची जबाबदारीही त्या कंपनीवर सोपवून पहिल्या वर्षी एका बाईकसाठी ६० हजार १४० रुपये यात प्रत्येक वर्षी वाढ करत पाचव्या वर्षी ७३ हजार १०० रुपये एवढा देखभाल दुरुस्तीचा खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या देखभालीसह ही फायर बाईक १३ लाख ७० हजार ७३५ रुपयांना पडणार आहे. त्यामुळे पाच बाईक्ससाठी ७१ लाख २७हजार ८२२ रुपये खर्च केले जाणार आहेत.


बाईकवरील खर्च

  • रॉयल एन्फील्ड हिमालयीन बाईकची किंमत : १ लाख ९३ हजार ८१६ रुपये
  • अग्निशमन दलाच्या तपशीलानुसार बांधणी : ८ लाख ४४ हजार ६०८ रुपये
  • पाच वर्षांचे एका बाईकची देखभाल दुरुस्ती खर्च : ३ लाख ३२ हजार ३११ रुपये
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा