इंस्टाग्रामवर तिच्या ट्रॅव्हल पोस्टमुळे चर्चेत असलेली अनवी कामदार हिचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळील रायगडमध्ये धबधब्यात पडून अनवीचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. याच क्षेत्रात तिने आपले करिअर केले.
रायगडमधील कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत असताना अनवीचा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्यात त्याचा मृत्यू झाला. अनवी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
अनवीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अनवी पावसाळ्यात कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी आली होती.
16 जुलैला ही बरेचशे पर्यटक कुंभे धबधब्यावर आले होते. त्यात रिल स्टार म्हणून ओळख असलेली अनवी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसह आली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. त्यावेळी अन्वी ही फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली होती. त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती जवळपास तीनशे ते साडे तीनशे फुट खोल दरीत कोसळली.
16 जुलैला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एकच आरडाओरड सुरू झाली. तातडीने ही माहिती माणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे माणगाव तहसीलदार विकास गारूडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम, सीस्केप रेस्क्यू टीम , कोलाड रेस्क्यु टीम, महावितरण कर्मचारी, आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल उपस्थित होते.
रेस्कू टीम कामाला लागली. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अनवीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिला जबर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा मृत्यू झाला.उपचारा दरम्यान तिला मृत घोषीत करण्यात आले.
या अपघातानंतर माणगाव तहसीलदार तसेच माणगांव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतः चा जीव धोक्यात घालू नका, जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असे आवाहन तरुण पिढीसह सर्व पर्यटकांना केले आहे.