SHARE

दहाव्या मानांकित व्हिएतनामचा ग्रँड मास्टर गुयेन डुक हॉने पश्चिम बंगालचा ग्रँडमास्टर निलोत्पल दासचा 50 चालीत पराभव करून सर्वाधिक 8.5 गुण मिळवत दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याने तीन लाख रुपये रोख रकमेच्या पुरस्कारासह प्रतिष्ठेचा मुंबई महापौर चषक पटकावला. दुसऱ्या पटावर प्रथम मानांकित ताजेकिस्तानचा ग्रँड मास्टर अमोनातोव्ह फारुखने रशियाचा ग्रँड मास्टर देवित्किन आंद्रेईवर विजय मिळवून 8 गुणांसह जोरदार मुसंडी मारली आणि रोख रक्कम दोन लाखांचा पुरस्कार मिळवत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांच्या हस्ते झाले.

वांद्रे येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात पहिल्या पटावर गुयेन डुक हॉ याने अँटी निमझो इंडियन पद्धतीने डावाची सुरुवात केली. 18 व्या चालीला निलोत्पल दासचा वजीर गुयेन डुक हॉच्या सापळ्यात अडकला. तरीही दासने अप्रतिम खेळ करत प्रतिस्पर्ध्याचा वजीर मिळवला. गुयेन डुकने डावावर वर्चस्व मिळवत 40 व्या चालीला दोन प्याद्यांचे अधिक्य राखले. त्यानंतर गुयेन डुकने 50 व्या चालीला प्याद्यांचे वजीरामध्ये रुपांतर करण्यात यशस्वी होताच निलोत्पल दासने डाव सोडला. अशा प्रकारे गुयेन डुक हॉंने निर्णायक दहाव्या फेरीत विजय मिळवून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या