चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर

२८ फेब्रुवारी रोजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर निवृत्त झाले. पडसलगीकर निवृत्त होऊन १२ तास उलटत नाहीत तोच काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपुरं मनुष्यबळ, आगामी निवडणुका आणि १०वी,१२ वी परीक्षेची कारणं पुढं करत, पोलिस शिपायांची ड्युटी पुन्हा १२ तास सुरू केली.

  • चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर
SHARE

कामाचा अतिरिक्त ताण, कमी संख्याबळ, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने अशा सततच्या ड्युटीमुळे पोलिस विविध आजारांनी त्रस्त आहेत.  त्यामुळे पोलिस कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याच्या उद्देशाने माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईतल्या ४५ पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केला. मात्र, पडसलगीकर निवृत्त होऊन १२ तास उलटत नाही, तोच मुंबईतल्या अनेक पोलिस ठाण्यातील वरिष्ठांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात बदल करत, पुन्हा '१२ तास ड्युटी' सुरू केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 


देवनारमध्ये प्रथम उपक्रम

देवनार पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई रवी पाटील यांनी या आठ तास ड्युटीच्या उपक्रमावर सहा महिने अभ्यास केला होता. राखीव पोलिस दलाची मदत घेतल्यास सर्व पोलिस ठाण्यात आठ तास ड्युटी शक्य असल्याचं सादरीकरण त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केलं.  हा उपक्रम सुरू केल्यास पोलिस कर्मचा‍ऱ्यांना मानसिक आणि कौटुंबिक समाधान मिळेल. आनंददायी वातावरणामुळे पोलिस सक्षमरित्या त्यांच्या जबाबदा‍ऱ्या नित्यनियमाने पार पाडतील, या उद्देशाने पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी पुढाकार घेऊन, देवनार पोलिस ठाण्यात पहिल्यांदा हा उपक्रम सुरू केला. काही महिन्यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने विविध पोलिस ठाण्यात पुढे हा उपक्रम सुरू करण्यात आला. 


सरकारही आग्रही

या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतरही पोलिस ठाण्यात आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्याबाबत तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती पोलिस महासंचालकपदी झाल्यानंतर आठ तास डयुटीबाबत सरकारही आग्रही होते. विधीमंडळातही आठ तास ड्युटीबाबत अधिकृत जीआर काढण्याची मागणी नुकतीच वडाळा विधानसेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली होती. 


अपुरं मनुष्यबळाचं कारण

 २८ फेब्रुवारी रोजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर निवृत्त झाले. पडसलगीकर निवृत्त होऊन १२ तास उलटत नाहीत तोच काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपुरं मनुष्यबळ, आगामी निवडणुका आणि १०वी,१२ वी परीक्षेची कारणं पुढं करत, पोलिस शिपायांची ड्युटी पुन्हा १२ तास सुरू केली. पार्कसाईट पोलिस ठाण्याबाहेरील सुचना फलकावर कर्तव्यात बदल करण्यात आल्याचंही लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर टप्याटप्याने सांताक्रूझ, आर.ए.किडवाई, पार्कसाईट पोलिस ठाण्यातही १२ तास ड्युटी सुरू केली. 


अडसर दूर

शाहू नगर पोलिस ठाण्यात बुधवारी आणि गुरूवारी १२ तास ड्युटी सुरू केली आहे. पडसलगीकरांनी आयुक्त असताना आठ तास ड्युटीला दर्शवलेल्या पाठिंब्यामुळे इतर आयपीएस अधिकाऱ्यांना या निर्णयाला विरोध दर्शवता येत नव्हता. मात्र, पडसलगीकरांच्या निवृत्तीमुळे हा अडसर आता दूर झाल्याचं बोललं जातं. हेही वाचा - 

शस्त्र तस्कर दानिश अलीविरोधात दोषारोपपत्र दाखल

नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!
संबंधित विषय
ताज्या बातम्या