Advertisement

मुंबईत पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता


मुंबईत पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र सोमवारी संध्याकाळी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून, पावसानं मुसळधार हजेरी लावली. त्याशिवाय, मुंबईत मंगळवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 

मुंबई, ठाण्याबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी २१ व २२ सप्टेंबर रोजी हवामानाविषयीचं ट्विट केलं आहे. होसळीकर यांनी सोमवारी व मंगळवारी पडणाऱ्या पावसाविषयी माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे दक्षिण कोकण व गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्याचबरोबर २२ सप्टेंबर रोजी मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम घाट परिसरातील रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पुढील २४ तासांत सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले, तरी सायंकाळनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा