Advertisement

येत्या २४ तासात पावसाची शक्यता

मागील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

येत्या २४ तासात पावसाची शक्यता
SHARES

ऐन हिवाळ्यामध्ये मागील आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. मागील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळं शुक्रवार ८ आणि शनिवार ९ जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

गुरुवार ७ जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गुरुवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शहापूरमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शहापूरमध्ये संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे वीट भट्टी आणि लागवड केलेल्या भाजीपाल्यावरसुद्धा अवकाळी पावसाने परिणाम झाला आहे.इतकंच नाही तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरु होती. अवकाळी पावसानं आंबा व्यवसायीक धास्तावले आहेत. या अवकाळी पावसानं आंबा हंगाम लाबण्याची शक्यता वर्तवली जाते.

मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, ८ जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, ८ आणि ९ जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर ८ आणि ९ जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा