मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज मुंबईसह, ठाणे, पालघर , रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. याचबरोबर विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मुंबईत दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. ज्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेनं या वाऱ्यांची वाटचाल सुरू होणार असून साधारण 6 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा