
मुंबईत यंदा पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून 10 टक्के पाणी कपात लागू होऊ शकते. एल निनोच्या परिणामामुळे नैऋत्य मोसमी पावसात तूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्याचा परिणाम शहराच्या जलसाठ्यावर होऊ शकतो.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहरातील सात तलावांमध्ये केवळ 28.79 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा अंदाजे जुलै अखेरपर्यंत पुरेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुंबईचा पाणीपुरवठा पूर्णपणे सात तलावांवर अवलंबून असून दररोज सुमारे 4,000 एमएल पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची एकूण मागणी 4,463 एमएल इतकी आहे. दरवर्षीचा एकूण पाणी वापर सुमारे 14.47 लाख एमएल आहे, जो प्रामुख्याने पावसावर अवलंबून असतो.
अधिकाऱ्यांच्या मते, यंदा पावसाला उशीर होण्याची शक्यता असून तापमान जास्त राहिल्याने बाष्पीभवन वाढेल. यामुळे तलावांमध्ये पाणी साठण्याचा वेग कमी होऊ शकतो.
दरम्यान, अतिरिक्त पाणी वापरण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. अपर वैतरणा तलावातून 68 हजार ML आणि भातसा तलावातून 1.13 लाख ML राखीव पाणी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय, पाण्याची गळती आणि अपव्यय ही मोठी समस्या ठरत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार सुमारे 34 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. तज्ज्ञांच्या मते, ही गळती रोखली तर मोठ्या प्रमाणात पाणी वाचू शकते आणि टंचाई टाळता येऊ शकते.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
27 एप्रिल रोजी सातही तलावांमधील पाण्याची स्थिती अशी आहे:
हेही वाचा
