Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी येत्या काही महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका मुंबईला सहन करावा लागणार आहे. शिवाय या लाटेत लहान मुलांना धोका असल्यानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेनं (bmc) तयारी सुरू केली आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेनं मुंबईतील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. तसेच विभाग स्तरावर कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना व झोपडपट्टीमधील रहिवाशांना संसर्गाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळाचे उपायुक्त, २४ प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांना कार्यवाही आणि अंमलबजावणीबाबत विशेष निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या सर्व विभागस्तरीय साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने सुरक्षित अंतर राखून आयोजित करावे, कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात येणार आहे.



हेही वाचा - 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १ जूनला विशेष लसीकरण सत्र

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे होणार Walk In Vaccination, 'या' रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा