एवढ्या मिरच्या का झोंबल्या? मलिष्का प्रकरणी विरोधकांचा सवाल

  BMC
  एवढ्या मिरच्या का झोंबल्या? मलिष्का प्रकरणी विरोधकांचा सवाल
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेवर विडंबन गीत रचून बदनामी करणाऱ्या रेड एफएमच्या रेडी जॉकी मलिष्काच्या घरी डासांच्या अळ्या सापडल्या. या अळया सापडल्यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना नोटीस देण्यात आल्यामुळे याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत उमटले. महापालिकेने मलिष्काच्या घरी कारवाई करण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेप्रमाणे त्यांनी मुंबईतील रस्त्यांवरील जर खड्डे बुजवले असते, तर योग्य ठरले असते, अशा शब्दांत विराधी पक्षांनी तसेच भाजपाने सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाला फैलाव धरले.


  महापालिकेची बदनामी…

  महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा हरकतीचा मुद्दा उपस्थित करत सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी मलिष्काच्या आईच्या घरी डासांच्या अळ्यांप्रकरणी जारी केलेल्या नोटीसचा विरोध दर्शवला. या माध्यमातून ट्विटरद्वारेही बदनामी होत असून, जर रस्त्यांवर खड्डे नाहीत तर प्रशासनाने तसे निवेदन करावे, अशी मागणी केली. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनीही या मुद्दयाला समर्थन देत मलिष्काने सद्यस्थिती मांडली आहे, ती नाकारता येणार नसल्याचे सांगत, या स्वतंत्र भारतात त्यांना आपले विचार मांडण्याचे अधिकार असल्याचे सांगितले.

  दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्विटरवरुन मलिष्काला पाठिंबा दर्शवला आहे...


  आधी खड्डे बुजवा…

  महापालिकेवर टीका केली, म्हणून त्यांच्या घरात शिरून त्यांना नोटीस देणे हा प्रकार योग्य नसल्याचे सांगत, भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी 'जर खड्डयांवरून टीका केली असेल, तर ते खड्डे बुजवून त्यांना तसे उत्तर द्यायला हवे', असे सांगितले. 'आज खड्डयांमुळे लोकांचे कंबरेचे मणके, माना मोडल्या आहेत. याप्रकरणी उद्या लोक आपल्या महापालिकेवर दावा करतील' असे सांगत 'आधी खड्डे बुजवून दाखवा', असे शालजोडीतले फटके प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनाही मारले.

  काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी तर मलिष्काला पाठिंबा देत असतानात शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे...


  अधिकाऱ्यांमध्ये गुंडप्रवृत्ती

  अधिकाऱ्यांमध्ये गुंडप्रवृत्ती जन्माला येत असल्याचे सांगत भाजपाचे अॅड. मकरंद नार्वेकर यांनी यापूर्वी अशा प्रकारे महापालिकेची बदनामी करणाऱ्या कपिल शर्मा यांनाही नोटीस बजावून त्यांच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. मुंबईत केवळ महापालिकेचेच रस्ते नाहीत तर एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य प्राधिकरणाच्या ताब्यातही रस्ते असून त्यावरही खड्डे असल्याची बाब शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी निदर्शनास आणली.

  राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही या वादात उडी घेत मुंबई महापालिकेवर टीका केली आहे..


  इतर कामांमध्येही अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी

  राज्य सरकारच्या ताब्यातील रस्त्यावर खड्डे असतील, तर त्यांनी ते बुजवावे. परंतु याच स्थायी समितीत दोन प्रस्ताव हे रस्त्यांची पाहणी करण्यासाठी राखून ठेवले असल्याची आठवण करुन देत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी अधिकारी ‘साईट’वर जाण्याच्या नावाखाली कामाकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे जी तत्परता मलिष्काच्या घरी अळ्या शोधण्यात दाखवली, तशीच तत्परता मुंबईतील इतर कामांमध्ये दाखवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


  घर शोधून जबरदस्तीने नोटीस

  मलिष्काने केलेल्या गाण्याच्या विडंबनाबद्दल बोलतात. परंतु याच मलिष्काबद्दल नगरसेविका किशोर पेडणेकर यांनी गाणे गायले त्याचे काय? असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. एफ एम रेडिओ हा सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांना तसेच स्वातंत्र्य दिले आहे. उद्या वृत्तपत्रांवरही अशाप्रकारे कारवाई केली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. स्त्यांवर खड्डे आहेत आणि तिने तेच आपल्या लक्षात आणून दिले आहे. याबद्दल एवढ्या मिरच्या झोंबण्याची गरज नव्हती, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.


  अळ्याच नव्हे, तर घरात अनधिकृत बांधकामही!

  हे गाणं रचण्यामागे राजकारण असून राजकीय शक्ती यामागे असल्याचा आरोप सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला. मलिष्काच्या घरी नव्हे, तर तिच्या आईच्या घरी डासांच्या अळ्या सापडल्या. एवढेच नाही, तर तिथे गेल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथे अनधिकृत बांधकाम असल्याचेही दिसून आले असून यावरही त्वरीत कारवाई केली जावी, अशी आपली मागणी राहील, असे यशवंत जाधव यांनी सांगितले. अखेर हरकतीचा मुद्दा चर्चेनंतर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी बाद ठरवला.  हेही वाचा

  डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.