Advertisement

मुंबई-नाशिक रेल्वे मार्गासाठी नव्या मार्गिकांना मंजूरी

या निर्णयामुळे नाशिक ते मुंबईदरम्यान लोकलसेवा सुरू होण्यासह काही नवीन गाड्यांसाठी दीर्घकाळ प्रलंबित स्लॉट समस्येचे समाधान होऊ शकेल, असा विश्वास खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई-नाशिक रेल्वे मार्गासाठी नव्या मार्गिकांना मंजूरी
SHARES

मनमाड-कसारा (kasara) आणि कसारा-मुंबई (mumbai) मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वेमार्गिका उभारण्यास केंद्रीय रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे नाशिक ते मुंबईदरम्यान लोकलसेवा सुरू होण्यासह काही नवीन गाड्यांसाठी दीर्घकाळ प्रलंबित स्लॉट समस्येचे समाधान होऊ शकेल, असा विश्वास खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक (nashik) -मुंबई लोकल सेवा सुरू व्हावी, ही नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

नवीन एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर गाड्या वाढवाव्यात याकरिताही अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. परंतु 'स्लॉट उपलब्ध नाहीत', असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते.

अपुऱ्या रेल्वेमार्गिका (railway lines) क्षमता हे या सर्व प्रश्नांचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर खासदार वाजे यांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

मुंबई विभागाकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड गर्दी असते. वेगवेगळ्या गाड्यांचे तासन्‌तास कोंडीत अडकणे, अप-डाउनची मर्यादित क्षमता, मालगाड्यांची वाढती संख्या आणि सिग्नलिंगवरील दडपणामुळे नवीन सेवांची अंमलबजावणी अशक्य होत होती.

ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर खासदार वाजे यांनी केंद्र व रेल्वे मंत्रालयाकडे मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई या दोन महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्वतंत्र दोन-दोन नवीन रेल्वेमार्गिका उभारण्याची मागणी केली.

ही मागणी मंजूर करण्यात आली असल्याने रेल्वे मंत्रालयाने दोन्ही मार्गांवर नवीन दुहेरी रेल्वेमार्गिका (double gauge) उभारण्यास मान्यता दिली आहे.

यामुळे नाशिक-मुंबई लोकल प्रकल्पाला गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेला हा सामान्य जनजीवनाशी थेट संबंधित प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्यास बळ मिळणार आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा