Advertisement

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवणार

झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणा-या किटकजन्य व साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा आयुक्तांनी या बैठकीत घेतला.

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवणार
SHARES

पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये झिका विषाणूची लागण झालेला राज्यातील पहिला रूग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाचे तातडीने विशेष बैठक घेतली.  यावेळी आयुक्तांनी झिका, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरासीस आजार होऊच नये याकरिता अधिक काळजीपूर्वक व प्रभावीरित्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिका-यांना दिले. 

झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणा-या किटकजन्य व साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा आयुक्तांनी या बैठकीत घेतला. तसंच  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण  तसेच डास उत्पत्ती स्थाने सर्वेक्षण याबाबतची सर्वेक्षण कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची सूचना यावेळी आयुक्तांनी केली. 

झिका विषाणू हा एडिस डासांमार्फत पसरतो व त्याची लक्षणे साधारणत: डेंग्यू आजाराप्रमाणे असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, अंगदुखी, सांधेदुखी ही झिका आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत. गरोदर महिलांना हा आजार झाल्यास होणा-या बाळाच्या डोक्याचा घेर कमी असण्यासारखे दोष उद्भवू शकतात. त्यामुळे याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

एखाद्या ठिकाणी डास झाले आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अथवा मलेरिया वा संशयित डेंग्युचे रूग्ण आढळल्यानंतर तेथे डासनाशक फवारणी केली जाते. मात्र याविषयी अधिक दक्षता घेत नागरी आरोग्य केंद्राच्या पथकांनी स्वत:हूनच अशा संभाव्य स्थानांवर नियमितपणे डासअळीनाशक फवारणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. रूग्ण आढळल्यानंतर कार्यवाही करावीच, मात्र आजार होऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात यावा असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

नागरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणारे सर्वेक्षण हे आजाराची व्याप्ती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. सर्वेक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याच्या तसेच याबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जानेवारीपासून मलेरियाचे 10 रूग्ण आढळले असून ते सर्व बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे डेंग्यूचे संशयित 36 रूग्ण आढळले असून त्यापेकी 28 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे व नजिकच्या काळातील उर्वरित 8 संशयितांचा अहवाल तपासणी प्रक्रियेत आहे. एखादा मलेरियाचा रूग्ण अथवा डेंग्यूचा संशयित रूग्ण आढळल्यास त्याच्या नजिकच्या 100 घरांमध्ये संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात असून त्या परिसरात व घरांमध्ये डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला जात आहे. 

 तसंच डासनाशक व अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण केले जात आहे. याशिवाय बांधकामे सुरू असलेल्या साईट्सवरही डास उत्पत्ती स्थाने होणार नाहीत यावर लक्ष ठेवले जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा