भारत (india) हा जगातील सर्वाधिक डाळ सेवन करणारा देश आहे. डाळीचे (pulse) उत्पादनही भारतातच सर्वाधिक होते. मात्र सातत्याने मागणी असल्याने भारताला दरवर्षी डाळींची आयात करावी लागते.
मागील काही वर्षांत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून डाळींचे पीक वाढविण्याचा प्रयत्न झाला. यंदा मात्र पाऊस कमी-अधिक झाल्याने डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाकडील आकडेवारीनुसार, यंदाच्या खरिपात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरणी क्षेत्रात सरासरी 0.31 टक्क्यांची घट झाली आहे. त्यातील सर्वाधिक 6.68 टक्क्यांची घट तुरीत आहे.
मसुरीच्या पेरणी क्षेत्रातही 4.79 टक्क्यांची मोठी घट आहे. मुगाच्या पेरणी क्षेत्रात 3.39 टक्क्यांची वाढ (increase) झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हरभरा वगळता, सर्व प्रकारच्या डाळींचे नवे पीक पावसाळ्यानंतर बाजारात येते. मात्र पावसाळ्यात पेरण्या कमी-अधिक झाल्यास, पीक बाजारात येण्याआधीच दरांमध्ये चढ-उतार होतात.
यंदा पेरणी क्षेत्रात घट झाल्याने पीक घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच बाजारात डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
डाळींच्या पेरणीचे खरिपातील चित्र समाधानकारक नसले, तरी सध्या दर (rate) स्थिर आहेत. मुंबईच्या (mumbai) किरकोळ बाजारात तूरडाळ 110 रुपये किलो, मुगडाळ 120 ते 125 रुपये किलो, तर उडदाची डाळ 140 ते 150 रुपये किलोवर स्थिर आहे.
हेही वाचा