Advertisement

550 चौरस फूट घरांसाठीही आता नागरी सुविधा

यापूर्वी 300 चौरस फुटांपर्यंत घरांचा आकार असलेल्या वसाहतींमध्येच नागरी सुविधा पुरविण्याची परवानगी होती.

550 चौरस फूट घरांसाठीही आता नागरी सुविधा
SHARES

नवी मुंबई (navi mumbai) महापालिका (nmmc) हद्दीत सिडकोने (cidco) उभारलेल्या वसाहतींमधील रहिवाशांना आता नागरी सुविधा मिळणार आहेत.

यासाठी राज्य सरकारच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या आदेशासह खासदार नरेश म्हस्के (naresh mhaske) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी 300 चौरस फुटांपर्यंत घरांचा आकार असलेल्या वसाहतींमध्येच नागरी सुविधा पुरविण्याची परवानगी होती. या मर्यादेमुळे शहरातील जवळपास 70 टक्क्यांहून अधिक वसाहतींमध्ये महापालिकेस नागरी सुविधा पुरविणे शक्य नव्हते.

आता राज्याच्या नगरविकास विभागाने 550 चौरस फूट आकाराची घरे असलेल्या सर्व सिडको वसाहतींमध्ये मलनिस्सारण तसेच जलवाहिन्यांची कामे करण्यास मंजुरी दिली आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवाशांच्या वतीने उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. सिडकोने नवी मुंबईत उभारलेल्या बैठ्या तसेच इमारतींमध्ये सुमारे चार लाख नागरिक वास्तव्यास आहेत.

सुरुवातीला सिडकोने रहिवाशांच्या नागरी संघटनांना ओनर्स असोसिएशन कायद्यांतर्गत नोंदणी करावी. तसेच नागरी सुविधांची देखभाल आणि दुरुस्ती घर मालकांकडून वसूल केलेल्या मासिक शुल्कातून करावी, असे ठरवले होते.

मात्र, बैठ्या आणि इमारतीतील सांडपाणी वाहिन्या आणि जलवाहिन्यांचे बदलणे रहिवाशांच्या क्षमतेबाहेर होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवाशांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

तसेच एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने 300 चौरस फुटाच्या घरांना नागरी सुविधा पुरविण्याचा अध्यादेश काढला.

यानंतर 550 चौरस फूट आकाराच्या सर्व सिडको वसाहतींमध्ये नागरी सुविधा मिळण्यासाठी खासदार म्हस्के यांनी नगरविकास विभागाकडे पुन्हा पाठपुरावा केला.

सुधारित अध्यादेशानुसार 550 चौरस फूट आकाराची घरे असलेल्या सर्व वसाहतींना नागरी सुविधा देण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले गेले आहेत.

या आदेशामुळे नवीन जल आणि सांडपाणी वाहिन्या बदलणे तसेच इतर नागरी सुविधा रहिवाशांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पाठपुराव्यात नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर आणि माजी नगरसेवक व पदाधिकारी सहभागी होते.



हेही वाचा

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींबाबत नगरविकास विभागाची बैठक

महाराष्ट्र सरकारकडून भजन मंडळांना निधी मंजूर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा