Advertisement

इमारत बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळणार दोन आठवड्यात!

सर्व बांधकामांसाठी सर्व विभागांची संयुक्तपणे पाहणी केली जाणार असून त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अवघ्या दोन आठवड्यांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

इमारत बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळणार दोन आठवड्यात!
SHARES

इमारत बांधकाम झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तींच्या तपासणीसाठी यापूर्वी प्रत्येक खात्याच्या माध्यमातून स्वतंत्रपणे स्थळ निरीक्षण केले जायचे. त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखल मिळण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला जायचा. परंतु आता सर्व बांधकामांसाठी सर्व विभागांची संयुक्तपणे पाहणी केली जाणार असून त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अवघ्या दोन आठवड्यांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


एकाच वेळी सर्व खात्यांकडून पाहणी

मुंबई महापालिकेच्या इमारत व प्रस्ताव विभागामार्फत इमारत बांधकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचाही दाखला दिला जातो. परंतु, हा दाखला मिळवण्यासाठी चार खात्यांची एनओसी बंधनकारक असते. चार खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे स्थळ निरीक्षण केल्यानंतर आपली एनओसी दिल्यानंतरच त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जायचा. परंतु, आता महापालिकेच्या संबंधित खात्यांमधील अधिकारी एकाच दिवशी व एकाचवेळी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच भेटीच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे पूर्वी स्थळ निरीक्षणासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असे, तो आता २ आठवड्यांवर आला आहे, अशीही माहिती विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंते संजय दराडे यांनी दिली आहे.


अॅटो डीसीआर सॉफ्टवेअरची मदत

‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम परवानग्या या ऑनलाईनद्वारे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे परवानग्यांची संख्या ११९वरुन ५८ करण्यात आली होती. त्यापाठोपाठ ही प्रक्रिया ‘अॅटो डीसीआर’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन देखील करण्यात आली. ज्यामुळे इमारत बांधकाम व्यवसायिक, वास्तुविशारद यांच्यासह नागरिकांना देखील इमारत बांधकामांची परवानगी प्रक्रिया कोणत्या स्तरावर आहे, हे जाणून घेता येत आहे.


एनओसी प्रक्रियाही झाली वेगवान!

मात्र, इमारत बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करताना महापालिकेच्या काही विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) प्राप्त करुन ती अपलोड करणे यापूर्वी गरजेचे असायचे. यामध्ये पर्जन्यजल वाहिनी, मलनिःसारण, जल अभियंता, वाहतूक व समन्वय इत्यादी खात्यांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांचा समावेश होता. मात्र, आता या ना-हरकत प्रमाणपत्रांच्या संबंधीची कार्यवाही अंतर्गत पद्धतीने करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामुळे बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होईल, असा विश्वास संजय दराडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.हेही वाचा

म्हाडाचा गोलमाल! बांधकाम साहित्याची तपासणी न करता दर्जा प्रमाणपत्र


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा