आता ‘डीएनए’मधून होणार क्षयरोगाचं निदान

 Mumbai
आता ‘डीएनए’मधून होणार क्षयरोगाचं निदान

मुंबई आणि उपनगरात वाढत्या लोकसंख्येसोबतच टीबीचं प्रमाणही तेवढंच वाढलंय. त्यातही एमडीआर आणि एक्सडीआर या टीबीमुळे रुग्णांना आणखी धोका वाढला आहे. जागतिक स्तरावर टीबीबद्दल जनजागृती जरी होत असली तरी आता या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन उपचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. ‘जीन एक्स्पर्ट’ ही नवीन मशीन टीबी रुग्णांच्या निदानासाठी वापरली जात आहे. या मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या डीएनएमधून टीबी आहे की नाही हे दिसून येतं. ‘जीन एक्स्पर्ट’ मशीनच्या सहाय्याने टीबी रुग्णाची तपासणी केली तर टीबीचं निदान अवघ्या 2 तासांत होतं. टीबीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या आजाराचं प्रमाण प्रचंड वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेत याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईत महापालिकेच्या वतीने टीबीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी निदान आणि उपचार यंत्रणा याकडे विशेष लक्ष वेधून रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत एमडीआर आणि एक्सडीआर टीबीचे प्रमाण मागील दीड-दोन वर्षांत वाढल्यानंतर याबाबत विशेष उपाययोजना शिवडी टीबी रुग्णालय, महापालिकेची प्रमुख रुग्णालये आणि आरोग्य केंद्राद्वारे राबवण्यास सुरुवात केली आहे.

एमडीआर (मल्टी ड्रग रेझिस्टन्स म्हणजे टीबीची पुढची पायरी) टीबी रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून जीन एक्स्पर्ट मशीन लोकमान्य टिळक रुग्णालयात खरेदी करण्यात आली. टीबी रुग्णाची आतापर्यंत थुंकी आणि शरीरातील पाणी याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत आजाराचं निदान केलं जायचं. यासाठी किमान 8 ते 10 तास एवढा अवधी लागतो. त्या तुलनेत जीन एक्स्पर्ट मशीनद्वारे अवघ्या 2 तासांत रुग्णाच्या टीबीमधील डीएनएतून याचं निदान करता येते. जीन एक्स्पर्ट मशीन आणि व्हिटामिन डी 3चं सहा लाख युनिटचं एक इंजेक्शन टीबी रुग्णाला दिलं तर टीबी रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

जीन एक्स्पर्ट’ ही मशीन रुग्णाच्या टीबीच्या डीएनए मधून टीबी आहे की नाही याचं निदान करते. या मशीनद्वारे तुम्हाला एमडीआर टीबी आहे की नाही हे कळतं. एखाद्या व्यक्तीला टीबी हा रोग असेल तर तो व्यक्तीला कळेपर्यंत आणि त्या रोगाचं निदान होईपर्यंत आणि तो बरा होईपर्यंत जवळपास 8 महिने लागतात. डॉक्टरांनी टीबी असल्याचं निदान केल्यानंतर रुग्ण घाबरतात आणि ट्रीटमेंट घेणं टाळतात. जर एखाद्या व्यक्तीला एमडीआर टीबी असेल तर ती व्यक्ती एका वर्षात आणखी 25 लोकांपर्यंत एमडीआर टीबी पसरवण्याची शक्यता आहे.’

सुलेमान मर्चंट, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय

काय आहे जीन एक्स्पर्ट -

अगदी 2 तासांत टीबी आहे की नाही किंवा एमडीआर म्हणजेच आहे की नाही हे कळते. तुमच्या शरीरातील जीन्स किंवा टीबीच्या डीएनएचे सॅम्पल्स घेतले जातात. ते सॅम्पल्स त्या मशीनच्या कार्ट्रेजमध्ये ठेवले जातात. मशीनच्या आत एकावेळी चार कार्ट्रेज ठेवले जातात. त्यातूनच तुम्हाला एमडीआर टीबी आहे की नाही याचं निदान होतं.

Loading Comments