Advertisement

उड्डाणपूल गेले खड्ड्यात!


उड्डाणपूल गेले खड्ड्यात!
SHARES

माटुंगा - खड्डे विरहित रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. त्यामुळे पालिका अनेक उपाययोजना राबवून खड्डे विरहित मुंबई करण्याचे प्रयत्न करीत असली तरी खड्डे बुजवण्याचे सामर्थ्य पालिकेकडे नसल्याचे चित्र मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवरून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीला चाप म्हणून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता उड्डाणपूल, परळ टीटी उड्डाणपूल, सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता उड्डाणपूल आणि जगन्नाथ नानाशंकरशेठ उड्डाणपूल या उड्डाणपुलांवरील रस्त्याला देखील खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.
परिणामी रस्ते आणि उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या खड्यांमुळे अपघातांबरोबर वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. तसेच पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यांमध्ये साचून राहिल्याने वाहनचालकांना अथवा पादचारी प्रवाशांना याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होऊ लागले आहेत.
याबाबत मुंबई महानगर पालिका मुख्य अभियंता (उड्डाणपूल) एस.पी.कोरी यांच्याशी चर्चा केली असता "या मार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यासाठी टेंडर काढण्यात आलेले आहे. परंतु पावसादरम्यान पालिकेच्या वॉर्ड प्रमाणे तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे, मात्र पाऊस सुरु असताना हे खड्डे बुजवणे शक्य होत नसल्याने पाऊस थांबताच खड्डे तातडीने बुजवण्यात येणार आहेत", असे त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय