Advertisement

मालाडच्या समुद्रात बस अडकली


मालाडच्या समुद्रात बस अडकली
SHARES

मालाड पश्चिमेकडील एरंगळ समुद्र किनाऱ्यावर गुरूवारी एक खासगी बस अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहू लागलेल्या या बसला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. सुदैवाने ही बस रिकामी असल्याने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

एक खासगी बस चालकाने बस धुण्याच्या उद्देशाने एरंगळ समुद्र किनाऱ्यावर आणली होती. येथील समुद्र किनारा सपाट असल्याने आणि बस आणताना किनाऱ्यावर पाणी नसल्याने बस चालकाने ती बरीच आतपर्यंत नेली. बस धुण्याचे काम सुरू असताना अवघ्या काही क्षणांतच हळूहळू समुद्राला भरती येऊ लागली. पाणी वाढू लागताच लाटांच्या दबावाने बसही डोलू लागली. बसची चाके वाळूत रुतल्यामुळे चालकाला ती बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाली आणि बघता बघता बस पाण्यावर तरंगू लागली.

त्यानंतर घाबरलेला बस चालक बसखाली उतरला आणि पाणी कमी होण्याची वाट पाहू लागला. काही तासांनी हळूहळू करत पाणी ओसरले. मात्र यादरम्यान जोरदार लाटांच्या तडाख्यामुळे बस उलटून तिचे बरेच नुकसान झाले होते. अखेरीस अग्निशमन दलाच्या मदतीने ही बस क्रेनच्या सहाय्याने पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान समुद्र किनाऱ्यावरुन बाहेर काढली.

या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसली, तरी बेधडकपणे समुद्र किनाऱ्यावर बस घेऊन येण्याच्या प्रकारामुळे सागरी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. चालक ही बस किनाऱ्यावर घेऊन येताना त्याला कुणीही अडवले नाही. तशी कुठलीही गस्ती यंत्रणा परिसरात नाही. 26/11 चा हल्लादेखील दहशतवाद्यांनी समुद्रावाटे मुंबईत शिरूनच केला होता. तेव्हा अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता ठेवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी नीतेश म्हात्रे यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा