दिल्ली-एनसीआर नंतर, नवी मुंबईमध्ये (navi mumbai) रिअल इस्टेटच्या (real estate) किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य घर खरेदीदारांसाठी नवी मुंबई खूपच महाग होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) च्या आगामी लाँचिंगसह, विमानतळाभोवतीच्या मालमत्तेचा बाजार वेगाने महाग होऊ लागला आहे.
विश्लेषकांचा अंदाज आहे की नजीकच्या भविष्यात किमतीत मोठी वाढ होईल. ही वाढ कदाचित जवळपास प्रति चौरस फूट 15,000 रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे.
विमानतळाजवळील पनवेल, उलवे आणि खारघर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी किमतीत मोठी वाढ होत आहे. चांगली कनेक्टिव्हिटी, वाढत्या रोजगाराच्या संधी आणि मोठ्या प्रमाणात व्यावसायिक विकास ही या वाढीमागील कारणे आहेत.
अनेक गुंतवणूकदारांनी या प्रदेशांमध्ये आधीच पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू आहे. ज्यामुळे जमीन आणि घरांच्या किमती आणखी वाढणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होईल आणि डिसेंबर 2025 पर्यंत व्यावसायिक विमान सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या विकासामुळे आजूबाजूच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे घरांची आणि व्यावसायिक मालमत्तांची मागणी आणि किंमत वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (NAINA) सध्या जमिनीचे दर 5 लाख ते 25 लाख रुपये प्रति गुंठा (सुमारे 101.17 चौरस मीटर) आहेत. याचा अर्थ प्रति चौरस मीटर किंमत 5,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान आहे.
विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर हे आकडे लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबईतील विशेषतः पनवेलमधील (panvel) मालमत्तेच्या किमती 5 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
सध्या, पनवेल आणि नवीन पनवेलमधील किमती स्थान आणि प्रकल्पानुसार प्रति चौरस फूट 6,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत.
तथापि, विमानतळ सुरू झाल्यानंतर, हे दर प्रति चौरस फूट 12,500 ते 15,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.
रिअल इस्टेटमधील ही तेजी गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी आहे, परंतु परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या मध्यमवर्गीय घर खरेदीदारांमध्येही यामुळे चिंता निर्माण होत आहे.
हेही वाचा