
सर्पदंश हा राज्यात अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यासाठी विधि आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
याशिवाय ‘रिजनल व्हेनम बँक’ तयार करण्यासाठी हाफकिन, वनविभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन बैठक घेण्यात येईल.
यासाठी केंद्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
राज्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात चार प्रकारचे प्रमुख विषारी साप आढळतात. साप कोणताही चावला तरी एकच ‘अँटी व्हेनम’ (anti venom)दिले जाते.
या सापांचे विष वेगवेगळे असले तरीही हेमोटॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन आणि कायटोटॉक्सिन या तीन प्रकारच्या विषांसाठी एकच पॉलिव्हॅलंट लस तयार केली जाते.
तामिळनाडूत सापडणारा नाग आणि महाराष्ट्रातला नाग वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक सापाच्या विषासाठी वेगवेगळ्या लसी तयार केल्या पाहिजेत.
यासाठी ‘रिजनल व्हेनम बँक’ तयार करता येईल का? पॉलिव्हॅलंट ऐवजी मोनोव्हॅलंट लसी तयार करता येईल का? अशी विचारणा विक्रम पाचपुते यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी यावेळी हाफकिनला भेडसावत असलेल्या आर्थिक चणचणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
हाफकिनला सध्या निधीची कमतरता जाणवत असल्याने पोलिओ तसेच सर्पदंशविरोधी लसीचे उत्पादन ठप्प आहे, असे सांगत पाटील यांनी निधी देण्याची मागणी केली.
यावर हाफकिनबाबत येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन प्रकाश आबिटकर यांनी दिले.
हेही वाचा
