Advertisement

मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; अनेक भाग जलमय, लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने,

मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर
SHARES

मुंबईत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 'नाऊकास्ट रेड अलर्ट' जारी करत पुढील तीन तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

परळ, दादर, शीव, भायखळा, कुलाबा आणि मरिन लाइन्स परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. तर अंधेरी, कुर्ला, बीकेसी, मुलुंडसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक संथ झाली. शेजारच्या पालघर जिल्ह्यातील विरारमध्येही मुसळधार पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिवसभर मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, उशिरा रात्री आणि पहाटे काही ठिकाणी अति अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.

तसेच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दुपारी 1.45 वाजता 4.27 मीटरची भरती येणार असल्याने किनारपट्टी आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. त्यानंतर 3 जुलैच्या पहाटे 1.31 वाजता 3.71 मीटरची भरती अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवांवरही झाला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असून, सकाळच्या कार्यालयीन गर्दीच्या वेळी हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई महानगर प्रदेशात सोमवारपासून पावसाचा जोर कायम असून, पुढील किमान चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा