Advertisement

मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान

रस्ते व रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागलं.

मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान
SHARES

मंगळवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईत तुफान बॅटिंग केली आहे. या पावसामुळं सर्व रस्ते, रेल्वे रूळ जलमय झाले. परिणामी रस्ते व रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे यंदा पावसानं कहर केला असून, मुंबईच्या अनेक भागांतील बैठ्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं.

मुंबईतील ग्रँट रोड, परळ, वरळी, एलफिन्स्टन हे भाग पाण्याखाली गेले. या भागांतील बैठ्या घरांमध्ये आणि इमारतींच्या तळमजल्यांवर असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळं घरातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून, घरातील भांडीकुंडी, धान्य, फ्रिज, कपडे या सगळ्यांचा चिखल झाला आहे. हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे सखल भागातील रहिवासी आधीच सावध होते.

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड, मशीद बंदर येथे तर मध्य मुंबईत भायखळा, नागपाडा, दादर, वरळी, नायगाव या परिसरांत २४ तासांत ३०० मिलिमीटर अधिक पाऊस पडला. गेल्या तीस वर्षांत जिथे पाणी भरले नाही, अशा भागांत चार आणि पाच ऑगस्टला पाणी भरले होते. त्याच भागात या वेळीही पाणी भरल्यामुळे रहिवाशांना पुन्हा त्या दिवसाच्या भीतीदायक आठवणी जाग्या झाल्या.

वरळीच्या बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक १०२ ते ११५ अशा १३ इमारतींच्या तळमजल्यावरील सर्व घरांमध्ये पाणी शिरले होते. वरळीच्या नेहरूनगर, अरविंदनगर या भागातील बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. पहाटे ३ वाजता पाणी शिरल्यानंतर पटापट घरातले सामान टेबलवर, खाटेवर ठेवून रहिवाशांनी आपले सामान वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी आपले सामान पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा