Advertisement

उंदरांमुळे मुंबईकर हैराण, दर महिन्याला 20 हजार उंदरांचा खातमा


उंदरांमुळे मुंबईकर हैराण, दर महिन्याला 20 हजार उंदरांचा खातमा
SHARES

उंदरांमुळे मुंबईकर सध्या हैराण झाले असून लेप्टोस्पायरोसीस आजार पसरविणाऱ्या उंदरांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडूनही जोरदार प्रयत्न होत आहेत. महापालिकेला अवघ्या चार महिन्यांत उंदरांच्या उपद्रवाच्या तब्बल पावणेचार हजार तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींनुसार चार महिन्यांत 81 हजार उंदरांना बिळातून बाहेर काढून मारण्यात आले. तरीही दरमहिन्याला सरासरी 900 तक्रारी येत असून सुमारे 20 हजार उंदरांचा खातमा केला जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

उंदीर वा घुशींमुळे उद्भवणाऱ्या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसीस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपिस’ (Xenopsylla cheopis) या पिसवा उंदीर - घुशींच्या केसांत आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते. तर लेप्टोस्पायरोसीसचे जीवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्याच्या मूत्राद्वारे जमीन, अन्नपदार्थ किंवा पाण्यात मिसळतात. या चतुष्पाद प्राण्यांमध्ये उंदरांचाही समावेश होतो. लेप्टोस्पायरोसीसचे विषाणू असलेली माती, पाणी, अन्न, पेयजल इत्यादींच्या संपर्कात माणूस आल्यास त्याच्या शरीरात हे जीवाणू तोंडाद्वारे किंवा जखमेद्वारे प्रवेश करू शकतात.

महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत मूषक नियंत्रणाचे काम प्रामुख्याने 4 पद्धतीने केले जाते. ज्यामध्ये उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे, विषारी गोळ्या टाकणे, बिळांमध्ये विषारी गोळ्यांनी वाफारणी करणे तसेच रात्रीच्यावेळी काठीने उंदिर मारणे; या चार पद्धतींचा समावेश होतो. या पद्धतींद्वारे जानेवारी ते डिसेंबर 2016 या एका वर्षाच्या कालावधीत एकूण 2 लाख 10 हजार 737 उंदिर मारण्यात आले. या दरम्यान नागरिकांच्या एकूण 10,551 तक्रारींचे निवारण देखील करण्यात आले. त्याचबरोबर यावर्षी म्हणजेच 2017 मध्ये जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांच्या कालावधी दरम्यान एकूण 81,050 उंदिर मारण्यात आले आहेत. याच कालावधीदरम्यान नागरिकांच्या एकूण 3,715 मूषक विषयक तक्रारींचे निवारणही करण्यात आल्याचे किटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

उंदराची एक जोडी करते 15 हजार उंदरांची उत्पत्ती-
सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर वा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे 18 महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे 21 ते 22 दिवसांत मादी उंदीर आपल्या पिल्लांना जन्म देते. एका वेळेस साधारणपणे 5 ते 14 पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले 5 आठवड्यात प्रजननक्षम होऊन ते देखील नव्या पिल्लांना जन्म देतात. ज्यामुळे उंदरांचे प्रजनन अनेक पटीत होते. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे 15 हजार पर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.

उंदिर का कुरतडतात?
लेप्टोस्पायरोसीस वा प्लेग सारख्या रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरणारे उंदीर मोठ्या प्रमाणात नासधूस देखील करत असतात. उंदरांचे पुढचे दात (Incisor teeth) सतत वाढत असतात. सतत वाढणाऱ्या या दातांची झिज व्हावी व ते नियंत्रणात असावेत, याकरीता उंदीर कायम कुठल्यातरी वस्तू कुरतडत असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंची नासधूस होऊन आपल्याला अनेकदा आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते. यामुळेच मोठ्या प्रमाणात असणारा उंदरांचा प्रजनन-दर, उंदरांमुळे होणारा संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी, यासाठी प्रभावी 'मूषक नियंत्रण' अत्यंत आवश्यक असल्याची माहिती राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

उंदरांची संख्या का वाढते?
वेगाने वाढणाऱ्या उंदरांच्या व घुशींच्या संख्येस शहरीकरणातील अनेक घटक देखील कारणीभूत असतात. शहर परिसरातील अनेक ठिकाणी स्वच्छतेच अभाव, उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे विक्रेते व कुठेही कचरा फेकण्याची अनेकांची सवय आणि त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारे अन्न यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभार लागतो. मूषक नियंत्रणासाठी स्वच्छतेविषयक जागरुकता असणे, हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अतिशय स्वच्छ ठेवलेल्या एखाद्या गृहनिर्माण सोसायटीतदेखील आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे तेथे उंदराचा उपद्रव आढळून येतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा