Advertisement

डॉक्टरांच्या सुरक्षेचा रिअॅलिटी चेक


डॉक्टरांच्या सुरक्षेचा रिअॅलिटी चेक
SHARES

मुंबई - डॉक्टरांना मारहाण, मग संप आणि त्यामुळे रुग्णांचे झालेले हाल. यावर उपाय म्हणून महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. त्यानुसार महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये शनिवारी 400 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.

पण, अजूनही काही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचं समोर आलंय. केईएमच्या सी.व्ही.टी.सी बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वारावर फक्त एकच जवान तैनात आहे. या बिल्डिंगमध्ये निवासी ह्रदयरोगतज्ज्ञ, डॉक्टर कार्यरत आहेत.

अशीच परिस्थिती सायन, कुपर या रुग्णालयातही असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सागर मुंदडा यांनी सांगितलं. एप्रिलच्या शेवटी खरंच सरकारने केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला आहे का हे पाहाव लागेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसंच सुरक्षारक्षक देण्यात आल्यामुळे आधीपेक्षा आताच्या परिस्थितीत फरक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ज्या रुग्णांलयाशी वैद्यकीय महाविद्यालये निगडीत आहेत त्यांनाच ही सुविधा देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

पण, जर मुख्य केईएम रुग्णालयात सुरक्षा वाढवली तर कदाचित त्यामुळे निवासी डॉक्टरांना सुरक्षा मिळेल. तसंच डॉक्टर हा रुग्णालयाचा एक छोटा भाग आहे. डॉक्टरांना एकाच वेळेस अनेक महत्त्वाची कामे करायची असतात. त्यातच हजारोच्या संख्येने रुग्ण येथे येतात. त्यांची एका वेळेस तपासणी करणं, त्यांची व्यवस्था करणं कठीण जातं. त्यामुळे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण होते. तसंच रुग्णांना हव्या असलेल्या उपकरणांच्या अभावामुळेही वाद होतात, अशी प्रतिक्रिया हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अंकुर फातरपेकर यांनी दिली.

अजूनही रुग्णालयाची परिस्थिती जैसे थे च आहे. आम्हाला अजूनही सुरक्षा मिळालेली नाही. अशी, प्रतिक्रिया निवासी डॉ. सनी शिंदे यांनी दिलीय. सर्व रुग्ण एका वेळेस एका ठिकाणी जमा होतात. अतिदक्षता विभागाला अजूनही सुरक्षारक्षक देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कधी कधी आमचाही खूप गोंधळ होतो अशी संतप्त प्रतिक्रिया केईएमचे निवासी डॉ. अभिजीत इलाले यांनी दिलीय. 

सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्यानंतर त्यानुसार हे सुरक्षारक्षक आपल्याला दिलेलं काम आणि जबाबदारी नीट पाळतात की नाही, हे पाहण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने सोमवारी केईम आणि नायर या रुग्णालयाची पाहणी केली. त्यात हे सर्व सुरक्षारक्षक येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची योग्य ती तपासणी करुनच आत सोडत असल्याचं दिसून आलं. तसेच रुग्णाबरोबर आलेल्या नातेवाईकाला पासही दिला जातो.

हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आता केईएम हॉस्पिटलमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. रुग्णालयात अनेक ठिकाणी अलार्म यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पोलीस किंवा सुरक्षारक्षकांना सतर्कतेचा इशारा मिळेल. केईएम मधील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग यामध्ये ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.


"पालिकेनं केलेल्या नव्या घोषणेनुसार केईएम रुग्णालयात जवळपास 80 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यात 15 बंदुकधारी सुरक्षारक्षक आहेत. तसंच केईएमकडे स्वत:चे 131 सुरक्षारक्षक आहेत. हे सुरक्षारक्षक केईएम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार 1,2,3,7, आपातकालीन विभाग आणि काही अतिदक्षता विभाग (आयसीयू) या विभागात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाते.

केईएममध्ये एका वेळेस 7 हजारपेक्षा जास्त रुग्ण येतात. त्यांच्याबरोबर प्रत्येकी 2 नातेवाईक म्हटलं तर ही संख्या सुमारे 21 हजारापेक्षा जास्त होते. त्यामुळे एका वेळी एवढ्या सर्वांची व्यवस्था करणं कठीण होतं. त्यातूनच डॉक्टरांसोबत बाचाबाची होण्याचे प्रसंग उद्धभवतात. रुग्णासोबत 2 नातेवाईक पुरेसे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती रुग्णासोबत असण्याची गरज नाही

- डॉ. मिलिंद साळवे, उपअधिष्ठाता, केईएम

तर, या सुरक्षारक्षकांमुळे रुग्णांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण किंवा हिंसा नक्कीच कमी होईल असं आश्नासन जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलंय. नायर रुग्णालयातही कडक बंदोबस्त करुन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग या विभागात सुरक्षारक्षकांसह अलार्म यंत्रणा बसवण्यात आली आहे. ज्यामुळे सुरक्षारक्षकांना अलार्म वाजताच सतर्कतेचा इशारा मिळेल. पहिल्या टप्प्यात 400 आणि 1 मेनंतर 300 सुरक्षारक्षक पुरवले जाणार आहेत. एक वर्षासाठी ही सुरक्षा रक्षक सेवा घेण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा