Advertisement

प्रजासत्ताक चिरायू होवो!! शिवाजी पार्कवरील चित्ररथाने घडवलं एकात्मतेचं दर्शन


प्रजासत्ताक चिरायू होवो!! शिवाजी पार्कवरील चित्ररथाने घडवलं एकात्मतेचं दर्शन
SHARES

देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहन करत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी देशासह राज्याच्या विकासाचा आढावा घेतला.


राष्ट्रध्वजाला सलामी

दादर शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाचं खास आर्कषण होतं ते परेड आणि आकर्षक चित्ररथ. मुंबई पोलिस, नौदल, मुंबई पोलिस वाहतूक विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अग्निशमन दल, मुंबई पोलिस बँड पथ, होमगार्ड, कोस्ट गार्ड, रेल्वे पोलिस आणि एसटी महामंडळ सुरक्षा रक्षक अशा सर्वच विभागातील जवानांनी परेडच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील कांदिवली, काळाचौकी आणि अन्य ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही परेडमध्ये सहभागी होत राष्ट्रध्वजाला सलामी दिली.



चित्ररथांचं आकर्षण

परेडनंतर एका मागून एक येणाऱ्या चित्ररथांनी उपस्थितांना खिळवून ठेवलं. सामाजिक न्याय विभाग, वन विभाग, एसटी महामंडळ, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, मुंबई पोलिस, महानिर्मिती, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अशा सरकारी विभागांच्या चित्ररथांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. झाडं वाचवा, झाडं जगवा असा संदेश देत ३ वर्षांमध्ये ५० कोटी झाडं लावण्याचं उद्दीष्ट कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार आहे हे दाखवून देणारा असा वनविभागाचा चित्ररथ होता. तर सर्वांना स्वच्छ पाणी मिळावं आणि प्रत्येक ठिकाण प्रत्येक गाव स्वच्छ व्हावं असा संदेश पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपल्या आकर्षक चित्ररथातून दिला.


म्हाडा, एसआरएचा चित्ररथ

निवारा ही मूलभूत गरज असून प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येकासाठी घर अशी हाक देत पंतप्रधान आवास योजना आणण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्विकासालाही चालना देण्यात आली आहे. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेद्वारे प्रत्येकाच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण कसं केलं जाणार आहे, याची मांडणी करणारा म्हाडाचा चित्ररथ आणि झोपडीमुक्त मुंबईचा एसआरएचा चित्ररथही सर्वांच्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.



लालपरी दिमाखात

राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी हळूहळू कशी आपली रूपडं बदलू लागली आहे, लालडबा ते आता नव्याकोऱ्या आकर्षक स्लिपरकोच शिवशाही गाड्यांपर्यंत एसटीने कशी मजल मारली आहे हे दाखवून देणारा चित्ररथ एसटी महामंडळाचा चित्ररथही उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. मेट्रो-मोनो, सागरी महामार्गासारख्या प्रकल्पातू मुंबईचा चेहरा-मोहरा कसा बदणार असून वाहतुक व्यवस्था कशी मजबूत दोणार आहे हे दाखवून देणारा 'एमएमआरडीए'चा चित्ररथ आणि मुंबईकर ज्यांच्यामुळे सुखाची झोप घेतात त्या पोलिसांच्या पराक्रमाचा लेखाजोखा मांडणारा पोलिसांचा चित्ररथही आकर्षक होता.

परेड आणि चित्ररथांबरोबरच या कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्षेपणास्त्राचं प्रदर्शन. सैन्याकडून वापरल्या जाणारी क्षेपणास्त्रं पाहण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानं उपलब्ध झाल्यानं उपस्थितांनी या प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा