Advertisement

महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्यास सुरूवात

महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.

महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्यास सुरूवात
SHARES

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असं आवाहन प्रशासनाने केलं असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणं लगेच सुरु करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

माणगाव पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव  दापोली  रस्ता  सुरु  झाला आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझर पासून पुढे  तेटघर पर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. तेटघर पासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोली कडून नातेखिंडला पोहोचता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचारायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

माणगाव येथे सुमारे २००० फूड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत अजून २००० अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड इथं प्रशासनाच्या संपर्कात राहावं व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असं आवाहन केल्याचंही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसंच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी  घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाटू लोणेरे इथं एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे, अशी माहिती यावेळी  देण्यात आली. एमआयडीसीचं अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा