• दुर्गंधी तर गेली, पण आवाजाचे काय?
SHARE

नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी पालिकेने हाय इल्ड वेस्ट अॅक्युमिलेटर ही मशीन बी विभागातील सॅन्डहर्स्ट रोड (प.) येथील नवरोजी हिल रोड क्र. चारवर बसवली. मात्र मशीन बसवल्याने दुर्गंधी जरी गेली असली तरी या मशीनच्या आवाजामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त झाले होते. या खुल्या कचराकुंडीचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी एएलएमच्या माध्यमातून पालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाकडे पाठपुरावा करूनही रहिवाशांच्या हाती काहीच लागले नाही. एएलएमच्या माध्यमातून वारंवार पालिकेच्या पायऱ्या झिजवल्यानंतर अखेर पालिकेने नागरिकांना दुर्गंधीपासून मुक्त करण्यासाठी हाय इल्ड वेस्ट अॅक्युमिलेटर ही मशीन बसवली. पालिकेने 20 लाख रुपये खर्चून मॅक एन्व्हायर्नमेन्ट अँड सोल्युशन प्रायव्हेट लि. या कंपनीकडून ही मशीन विकत घेतली आहे. या मशीनमध्ये 16 मॅट्रिक टन कचरा घेऊन जाण्याची क्षमता असून ही मशीन हायड्रॉलिक टेक्नॉलॉजीवर चालते, अशी माहिती मॅक एन्व्हायर्नमेन्ट अँड सोल्युशन प्रायव्हेट लि. या कंपनीचे अधिकारी आनंद तेंडुलकर यांनी दिली आहे. पालिकेने दुर्गंधीपासून तर मुक्त केले, पण आता या यंत्रणेमुळे आवाजाचा मोठा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. 

मशीन नवीन असल्याने काही काळ स्थानिकांना आवाजाचा त्रास होईल. एकदा मशीनला पूर्णपणे ऑइलिंग झाली, की हा आवाज कमी होईल.

उदय कुमार शिरूरकर, सहाय्यक आयुक्त, बी विभाग, पालिका


ही यंत्रणा खूपच खर्चिक आहे. याचा आवाजही होतो. परिसरातून दिवसाला 50 मॅट्रिक टन कचरा निघतो. 20 लाख रुपये खर्च करुन ही यंत्रणा बसवण्यापेक्षा पालिकेने सुका आणि ओला कचरा वेगळा करुन त्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट खत तयार केले असते तर त्याचा वापर झाडांनाही झाला असता आणि पर्यावरणाचेही संरक्षण झाले असते.

- साधिक उटनवाला, अध्यक्ष, हेल्प एएलएम

संबंधित विषय
ताज्या बातम्या