Advertisement

रूग्णालयातच साजरा झाला सयामी रिद्धी, सिद्धीचा चौथा वाढदिवस!


रूग्णालयातच साजरा झाला सयामी रिद्धी, सिद्धीचा चौथा वाढदिवस!
SHARES

तीन वर्षांपूर्वी परळच्या बी. जे. वाडिया बाल रुग्णालयात अत्यंत चिंताजनक अवस्थेत दोन सयामी जुळ्या बहिणींना दाखल करण्यात आलं होतं. शरिराने एकमेकींना 180 कोनात चिकटलेल्या या दोघी बहिणी खरंच एकमेकींपासून वेगळ्या होतील का? वेगळ्या झाल्यास त्या वाचतील की नाही? अशा एक ना अनेक शंकाचं काहूर मुंबईतील प्रत्येक संवेदनशील पालकाच्या मनात माजलं होतं. परंतु वाडियातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या दोघींना यशस्वीरित्या वेगळं करून तर दाखवलंच, पण त्यासोबतच इतरांप्रमाणेच सर्वसामान्य जीवन जगण्याची नवी उमेदही दिली. रिद्धी आणि सिद्धी अशी या दोघींची नावं. गेल्या तीन वर्षांपासून या दोघी वाडिया रुग्णालयातच वास्तव्यास आहेत. एकप्रकारे हे त्यांचं दुसरं घरच बनलंय. दुखणं असो किंवा मौजमजेचे क्षण. सारंकाही या रुग्णालयाच्या आवारातच अनुभवणाऱ्या दोघींचा चौथा वाढदिवस मंगळवारी येथील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सोबतीने साजरा करण्यात आला.

2013 साली पनवेलच्या एका दाम्पत्याला या सयामी जुळ्या मुली झाल्या. त्यावेळी या मुली एकमेकांना जन्मत:च 180 अंशात चिकटलेल्या होत्या. त्यानंतर 2014 साली वाडिया रुग्णालयातच रिद्धी आणि सिद्धीला एकमेकींपासून वेगळं करण्यात आलं. तेव्हापासून त्यांची काळजी आणि संगोपन वाडिया रुग्णालयातर्फेच करण्यात येत आहे. आकलनक्षमता विकसित करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे या दृष्टीने दोघींकडून सराव करुन घेतला जात आहे. सध्या या दोघीजणी रुग्णालयाजवळील प्रथम स्कूलच्या बालवाडीत जातात. त्यांना शाळेत पीअर ग्रुप थेरेपी दिली जाते. त्यामुळे त्यांना दिनचर्येत रुळण्यास मदत होते. त्यांना काही मुळाक्षरेही शिकवण्यात येत आहेत.

या दोघींना रुग्णालयात दाखल केलं होतं, तेव्हा त्यांचं गर्भाशय आणि मूत्राशय एकच होतं. त्याचं डॉक्टरांनी विभाजन केलं. त्यांचा सांभाळ अत्यंत संवेदनशीलतेने करणे गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या मुलींची सर्व काळजी घेत असल्याचं वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितलं. या दोघीही वाडिया रुग्णालयात लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांना दोघींचा लळा लागला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या दोघींचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा