
राज्यात (maharashtra) उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने शुक्रवार 17 एप्रिल रोजी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई (mumbai), रायगड आणि रत्नागिरीसह एकूण 23 जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागातील या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहणार असून कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 ते 27 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार आहे.
येथे कमाल तापमान 38 ते 41 अंश, तर किमान तापमान 22 ते 26 अंश राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी कडक उन्हाचा त्रास अधिक जाणवेल. या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने इथे दिला आहे.
येथे कमाल तापमान 35 ते 39 अंश, तर किमान तापमान 22 ते 25 अंशांदरम्यान राहील. काही ठिकाणी हलका ढगाळपणा जाणवू शकतो.
पुण्यातही उष्ण हवामान राहील. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र राहणार आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उष्णता जाणवणार आहे. या भागात कमाल तापमान 40 ते 44 अंश, तर किमान तापमान 24 ते 28 अंश राहण्याचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असेल. दरम्यान, महाराष्ट्रात 17 एप्रिल उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळेल. त्यामुळे 11 ते 4 या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.
उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
